Home » महाबळेश्वर » असा दादा पुन्हा होणे नाही…’; महाबळेश्वरमध्ये राहुल सकपाळ यांचा अजितदादांवरील भावपूर्ण देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

असा दादा पुन्हा होणे नाही…’; महाबळेश्वरमध्ये राहुल सकपाळ यांचा अजितदादांवरील भावपूर्ण देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू!

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय आणि समकालीन घडामोडींवर आधारित जिवंत देखावे सादर करण्याची एक मोठी परंपरा राहिलेली आहे. समाजप्रबोधनासोबतच समाजातील सुख-दुःखाचे क्षण, महत्त्वपूर्ण घटना आणि कर्तबगार नेतृत्वाच्या आठवणींना या देखाव्यांच्या माध्यमातून उजाळा दिला जातो. याच परंपरेचे औचित्य साधत यंदाच्या गणेशोत्सवात पर्यटननगरी महाबळेश्वरमधील युवा सामाजिक कार्यकर्ते राहुल अर्जुन सकपाळ यांनी सादर केलेला देखावा संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

​महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर, अभ्यासू आणि कार्यसम्राट नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासावर आणि स्मृतींवर आधारित भावपूर्ण देखावा राहुल सकपाळ यांनी महाबळेश्वर शहरात साकारला आहे. अजितदादांचे प्रशासनावरील प्रभुत्व, त्यांचा धडाडीचा स्वभाव आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान या देखाव्यातून अत्यंत हुबेहूब रेखाटण्यात आले आहे.

​”असा दादा पुन्हा होणे नाही… कामाचाच माणूस! शरीर मरते, नाम नाही… बेट्यानो, धंदा-पाणी करा, राजकारण लई वंगाळ!” या अजितदादांच्या शैलीतील ठळक आणि रोखठोक वाक्यांनी हा देखावा अधिक जिवंत आणि भावुक बनवला आहे. दादांचा रोखठोकपणा आणि कार्यसंस्कृती दर्शवणारे हे संदेश पाहून नागरिक आणि भाविक मनापासून हेलावून जात आहेत.

​हा देखावा पाहताना नागरिक भावुक होत असून, दादांच्या आठवणींनी परिसर अक्षरशः गहिवरून जात आहे. त्यांच्या नेतृत्वाचा आदर आणि त्यांच्या आठवणींना दिलेली ही अनोखी कलात्मक श्रद्धांजली उपस्थितांच्या मनाला थेट भिडत आहे. देखाव्यातील संवाद, पार्श्वसंगीत आणि अजितदादांच्या विकासकामांची दिलेली माहिती यामुळे हा देखावा अत्यंत जिवंत वाटतो.

​सध्या हा देखावा पाहण्यासाठी महाबळेश्वर शहर, तसेच आसपासच्या पाचगणी, जावली आणि ग्रामीण भागातील नागरिक व पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. स्थानिक नागरिक तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत आहेत. सामाजिक भान जपत आणि राजकीय संस्कृतीला साजेसा असा हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवातील सर्वात उठावदार आणि प्रभावी देखावा म्हणून नावारूपाला आला आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers