पाचगणी न्यूज नेटवर्क / प्रमोद रांजणे
पांचगणी : “सदरक्षणाय खलनिग्रहाणाय” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून जनतेच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांच्याच नावाने सध्या भामटे नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. “आम्ही पोलीस आहोत,” असे सांगत नकली ओळखपत्र दाखवणे आणि हातचलाखीने दागिने अथवा मौल्यवान वस्तू लंपास करणे, अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाई, मेढा आणि भुईंज परिसरात घडलेल्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आता पाचगणी पोलीस ठाणे पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाचगणी पोलिसांनी केले आहे.
सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला, पुरुष आणि गर्दीच्या ठिकाणी वावरणारे वयोवृद्ध नागरिक सध्या या भामट्यांचे मुख्य ‘टार्गेट’ ठरत आहेत. रस्त्यात अडवून किंवा गप्पांमध्ये ओढून, पुढे नाकाबंदी आहे किंवा सुरक्षेचे कारण सांगून अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवण्यास भाग पाडले जाते आणि क्षणार्धात ते लंपास केले जातात. त्यामुळे रस्त्यात कोणत्याही व्यक्तीने स्वतःची ओळख पोलीस म्हणून सांगितली, तरी घाईघाईने विश्वास न ठेवता प्रथम त्यांचे अधिकृत ओळखपत्र (ID Card) तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. संशय आल्यास कसलीही भीती न बाळगता तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा.
केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत आहेत. विशेषतः दुर्गम भागातील बंद घरे, दुकाने तसेच तांब्या-पितळेची भांडी व मौल्यवान वस्तूंची चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी रात्रीच्या वेळी घर व दुकाने व्यवस्थित लॉक करावीत, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास कार्यरत ठेवावेत आणि शेजाऱ्यांशी उत्तम समन्वय ठेवून संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास स्वतः थेट कारवाई न करता तात्काळ पोलीस ठाण्याला माहिती द्यावी.
जागरूक नागरिक आणि तत्पर पोलीस यांच्यातील उत्तम समन्वयातूनच गुन्हेगारीमुक्त व सुरक्षित समाज निर्माण होऊ शकतो. आपली थोडीशी जागरूकता हीच गुन्हेगारांचे धाबे दणाणण्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरेल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अधिक सतर्क राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) दिलीप पवार यांनी केले आहे.



