Home » पांचगणी » पाचगणी, महाबळेश्वर परिसरात परप्रांतीय स्पा कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पाचगणी पोलिसांना निवेदन

पाचगणी, महाबळेश्वर परिसरात परप्रांतीय स्पा कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पाचगणी पोलिसांना निवेदन

पाचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी: महाबळेश्वर आणि पाचगणी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळांमध्ये परप्रांतीय व परदेशी महिलांचा स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रात्री-अपरात्री मुख्य बाजारपेठ आणि मार्केट यार्ड परिसरात अशा संशयास्पद हालचाली वाढल्या असून, यामुळे स्थानिक संस्कृती धोक्यात येण्याची तसेच अमली पदार्थांचा (ड्रग्स) शिरकाव होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अशा सर्व परप्रांतीय व्यक्तींची कडक चौकशी करून योग्य ती बंधने घालावीत, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) वतीने पाचगणी पोलीस ठाण्यात आज निवेदन सादर करण्यात आले.

​राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील व सातारा जिल्हा युवक अध्यक्ष समीर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन हाती घेण्यात आले. महाबळेश्वर तालुका युवक अध्यक्ष आशिष शिंदे, युवक राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष आशिष चोरगे आणि सातारा जिल्हा उपाध्यक्ष रोहित नवसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन पाचगणी पोलिसांना सुपूर्द करण्यात आले.

​पर्यटननगरी असलेल्या पाचगणी व महाबळेश्वर परिसरातील अनेक हॉटेल्स आणि स्पा सेंटर्समध्ये परप्रांतीय महिला व तरुण कार्यरत आहेत. मात्र, हॉटेलमधील कामाच्या वेळा संपल्यानंतरही हे कर्मचारी रात्री-अपरात्री बाजारपेठेत मोकाट फिरताना आढळून येत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत या प्रमाणांत लक्षणीय वाढ झाली आहे. पनवेल किंवा उलवेसारख्या शहरांमध्ये ज्याप्रमाणे परप्रांतीयांच्या अनियंत्रित वावरामुळे ड्रग्ज व अमली पदार्थांचे जाळे पसरले, तशी परिस्थिती आमच्या शांत आणि सुसंस्कृत पर्यटनस्थळात निर्माण होऊ नये, अशी भीती यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

​संबंधित व्यक्ती कोणत्या हॉटेलमध्ये कार्यरत आहेत, त्यांची पदे काय आहेत आणि त्यांच्या राहण्याची सोय कुठे करण्यात आली आहे, याचा सखोल अहवाल पोलिसांनी त्वरित तयार करावा. तसेच या कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर कायदेशीर बंधने घालून योग्य त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी महाबळेश्वर तालुका युवक उपाध्यक्ष कृतिक अमराळे, सामाजिक न्याय विभागाचे जावळी तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, संदीप शिंदे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers