Home » जावळी » काटवली, बेलोशीत ‘नेचर केअर टेकर’तर्फे सर्पविज्ञान व पर्यावरण जनजागृती; विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

काटवली, बेलोशीत ‘नेचर केअर टेकर’तर्फे सर्पविज्ञान व पर्यावरण जनजागृती; विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : जंगल-वनसंपदेचे रक्षण आणि सर्पांविषयी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याच्या उद्देशाने ‘नेचर केअर टेकर’ संस्थेच्या वतीने प्राथमिक शाळा काटवली आणि केंद्र शाळा बेलोशी येथे पर्यावरण आणि सर्पविज्ञान जनजागृती उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रात्यक्षिके आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने नटलेल्या या कार्यक्रमास दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

​कार्यक्रमादरम्यान सर्पमित्र आमीर बेलोशे यांनी प्रत्यक्ष साप पकडण्याचे थरारक प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच विविध सापांची चित्रे व प्रत्यक्ष सर्प दाखवून विषारी आणि बिनविषारी सापांमधील भेद अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केला. सापांबद्दल मुलांच्या मनात असलेली भीती दूर करत, सर्प हे निसर्गाचे मित्र कसे आहेत, हे त्यांनी पटवून दिले.

​दुसऱ्या सत्रात संस्थेचे अध्यक्ष गणेश गोळे यांनी वाढते वनवे आणि पर्यावरण र्‍हासावर चिंता व्यक्त केली. अंधश्रद्धा, जुन्या रूढी-परंपरा आणि “गवत जाळल्यास नवीन गवत जोमाने येते” या चुकीच्या गैरसमजांमुळे जंगलांना वनवे लावले जातात. यामुळे मौल्यवान वनस्पती आणि वन्यजीवांची अपरिमित हानी होते. विद्यार्थ्यांनी आता स्वतः जंगल व वनसंपदा वाचवण्याची जबाबदारी हाती घ्यावी आणि आपल्या पालकांमध्येही वनवे न लावण्याबाबत जागृती करावी, असे आवाहन गोळे यांनी केले.

​याप्रसंगी केंद्रप्रमुख नितीन फरांदे, सर्पमित्र अभिषेक गोळे, प्रवीण बेलोशे, लक्ष्मण पार्टे, विकास पार्टे, रवी पार्टे, सर्पमित्र विजय, बासरीवादक अक्षय रांजणे, सामाजिक कार्यकर्ते मोहन बेलोशे यांच्यासह दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन आणि सर्प संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers