पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप
केळघर : जावळी तालुक्यातील केळघर परिसरातील ५४ गावांच्या विकासासाठी बोंडारवाडी धरणाचे स्वप्न पाहणारे कैलासवासी विजयराव मोकाशी यांच्या हयातीमध्ये जावळी तालुक्यातील ५४गावांसाठी बोंडारवाडी धरण होणे आवश्यक होते पण ते झाले नाही. प्रशासनाचे वेळ काढून पणामुळे बोंढरवाडी धरणास विलंब लागला आहे यासाठी ३० नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल. असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिला आहे.
बोंडारवाडी धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने कैलासवासी विजयराव मोकाशी यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते
वरोशी तालुका जावळी येथे बोलत होते.
बोंडारवाडी धरणाला चार वर्षांपूर्वी मान्यता मिळून देखील धरणाच्या ट्रायल पीट(विंधन विवरे) चे काम करण्यासाठी प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. जोपर्यंत बाधित शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत धरणाचे काम करू नये. अशी ठोस भूमिका बोंडारवाडी धरणग्रस्त कृती समितीने घेतली बोंडारवाडी धरण परिसरातील ५४ गावातील ग्रामस्थ, शेतकरी ठिय्या आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श .प.) प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य कविता ओंबळे, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, पंचायत समिती सदस्य आतिश कदम, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र मोकाशी, मोहनराव कासुर्डे , आदिनाथ ओंबळे, ज्योतिरादित्य मोकाशी,,बळवंत पाडळे, यांच्यासह कृती समितीचे मुंबई, पुणे व ५४ गावातील कृती समितीचे पदाधिकारी, शेतकरी, महिला, युवक मोठ्या संख्येने अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. भारत पाटणकर पुढे म्हणाले,एक टीएमसी क्षमतेचे बोंडारवाडी धरणाची जागा निश्चित करण्यासाठी ही ट्रायल पीट करणे क्रमप्राप्त आहे. ट्रायल पीट झाल्यावर धरणाला तांत्रिक मान्यता मिळणार आहे. आधी पुनर्वसन मग धरण हे कृती समितीचे धोरण असून बाधित शेतकऱ्यांचे योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन होण्यासाठी कृती समिती पाठपुरावा करणार आहे. ट्रायल पीट होण्यासाठी ५४ गावांतील सर्वांना सोबत घेऊन जनआंदोलन उभे राहणार आहे. धरणाचे ट्रायल पीट होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहिल. असे डॉ. पाटणकर यांनी शेवटी सांगितले.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे ,मा. आ. सदाशिव सपकाळ, कविता ओंबळे,नारायण धनावडे, विजय ओंबळे, उषा उंबरकर, विनोद शिंगटे यांनी मनोगत व्यक्त केली. आदिनाथ ओंबळे यांनी प्रास्ताविक केले.एकनाथ सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. वैभव ओंबळे यांनी आभार मानले.
_____________________________



