पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप
सोनगाव : जावळी तालुक्यातील अर्थकारणाचा मुख्य कणा आणि एकमेव सहकारी औद्योगिक प्रकल्प असलेल्या ‘गुडगुंटी प्रतापगड शुगर्स अँड बायोएनर्जीज’ (प्रतापगड सहकारी साखर कारखाना, सोनगाव-करंदोशी) चा आगामी गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा बुधवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी १.०० वाजता वामन जयंतीच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
हा सोहळा प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व जावळी पंचायत समितीचे सभापती सौरभ राजेंद्र शिंदे, गुडगुंटी प्रतापगड शुगर्सचे चेअरमन विरुपाक्षय्या जगदीश गुडगुंटी आणि कारखान्याच्या मार्गदर्शक संचालिका श्रीमती सुनेत्रा राजेंद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. याप्रसंगी कारखान्याचे संचालक विजय महादेव शेवते आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. हेमा विजय शेवते यांच्या हस्ते धार्मिक विधीवत बॉयलर अग्नीप्रदीपन केले जाईल.
महाराष्ट्रात युती सरकार असताना ९ नोव्हेंबर १९९६ रोजी माजी आमदार स्व. लालसिंगराव शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी अथक परिश्रमांतून जावळी तालुक्यातील या पहिल्या साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली होती. दैनंदिन २,५०० मेट्रिक टन (TCD) ऊस गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याने मागील हंगामात सुमारे सव्वातीन लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले होते. आगामी गळीत हंगामात अजिंक्यतारा-प्रतापगड उद्योग समूहाच्या वतीने गाळपाचे उद्दिष्ट अधिक उंचावण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. कारखान्याच्या या माध्यमातून परिसरातील ४०० ते ६०० कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळण्यासोबतच हजारो ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदारांच्या हाताला काम मिळते.
या सोहळ्यास प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व सन्माननीय सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार, व्यापारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिफ जनरल मॅनेजर तथा युनिट हेड एम. एम. हिरेमठ यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे यांच्यासह सर्व संचालक मंडळ जय्यत तयारी करत आहे.



