Home » पांचगणी » जावळी तालुक्यात पावसाची दडी : दापवडी विभागात पिके करपु लागली ; तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची पंचक्रोशीच्या सभेत ठराव

जावळी तालुक्यात पावसाची दडी : दापवडी विभागात पिके करपु लागली ; तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची पंचक्रोशीच्या सभेत ठराव

पांचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : जावळी तालुक्यातील दापवडी विभागात यंदा पर्जन्यमानाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. सुरुवातीपासूनच असमाधानकारक झालेला पाऊस आणि आता पिके ऐन भरात आलेली असतानाच पावसाने दडी मारल्याने संपूर्ण परिसरातील पिके पाण्याभावी डोळ्यांदेखत करपू लागली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाल्याने बळीराजा पूर्णपणे चिंताक्रांत झाला आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे तीव्र उन्हाळ्यापूर्वीच परिसरात आतापासूनच भीषण पाणी आणि चारा टंचाईची गडद सावली पसरू लागली आहे.

​या पार्श्वभूमीवर, दापवडी पंचक्रोशीतील पिकांची बिघडलेली गंभीर परिस्थिती विचारात घेऊन या संपूर्ण परिसरामध्ये शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव दापवडी पंचक्रोशी विकास संस्था आणि दापवडी पंचक्रोशी बहुउद्देशीय पर्यटन सहकारी संस्था यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते व बहुमताने संमत करण्यात आला.

​बेलोशी (ता. जावली) येथील कै. ह. भ. प. दत्तात्रय कळंबे महाराज समाज मंदिरात आज या दोन्ही संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडल्या. या सभेत संस्थेच्या सभासदांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक होत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लावून धरली.

​या सभेला पंचक्रोशीचे अध्यक्ष संजय बेलोशे, उपाध्यक्ष नितीन गावडे, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष विजय चोरट, उपाध्यक्ष प्रकाश रांजणे, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष रविकांत बेलोशे, तसेच काटवली सोसायटीचे अध्यक्ष शंकर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

​सभेच्या सुरुवातीला नारायण जाधव यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग, जमा-खर्च आणि नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली.

 

त्यानंतर पंचक्रोशीच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या भव्य ‘पंचक्रोशी भवन’ इमारतीच्या संथ आणि प्रगतीपथावर असलेल्या कामाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. या वेळी बोलताना उपाध्यक्ष नितीन गावडे म्हणाले, “शासकीय निधी, सभासदांची वर्गणी आणि दानशूर देणगीदारांच्या बहुमूल्य सहभागातून ही भव्य-दिव्य इमारत आकाराला येत आहे. हे पंचक्रोशीचे वैभव सकारास आणण्यासाठी सर्वांनी सढळ हाताने मदत करावी.”

 

​या सभेत इमारत बांधकामाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेस दिनकर भाऊ रांजणे, माजी सरपंच हणमंत रांजणे, दिनकर बेलोशे, महादेव बेलोशे, शंकरराव बेलोशे, बबनराव शिंदे, साहेबराव गोळे, प्रकाश बेलोशे, रामचंद्र शिंदे, राजाराम बेलोशे, चंद्रकांत बेलोशे, अंकुश बेलोशे, अशोक बेलोशे, वसंत रांजणे, रमेश रांजणे, अनिल नाना रांजणे यांच्यासह दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी, संचालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी संजय बेलोशे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers