Home » पांचगणी » पांचगणी व परिसरात १३ मंडळे अन् १९६० हून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन; १ अधिकारी, २४ कर्मचारी व १९ होमगार्डचा बंदोबस्त

पांचगणी व परिसरात १३ मंडळे अन् १९६० हून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन; १ अधिकारी, २४ कर्मचारी व १९ होमगार्डचा बंदोबस्त

पाचगणी, न्यूज नेटवर्क

पांचगणी : गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक आणि पारंपरिकतेची जोड देत पाचगणी परिसरात यंदा गणरायाला शांत, भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. डॉल्बीच्या दणदणाटाला तसेच कर्कश आवाजाला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. पाचगणी परिसरातील १३ सार्वजनिक गणेश मंडळांसह १९६० हून अधिक घरगुती गणपतींचे विविध विसर्जनस्थळी भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलेयामध्ये दीड दिवस, सहा दिवस आणि सात दिवसांच्या गणपतींचाही समावेश होता.

गणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावे, यासाठी गावागावात विशेष नियोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी कृत्रिम पाण्याचे कुंड तयार करण्यात आले होते.त्यामुळे नागरिकांना आपल्या घरगुती गणपतींचे विसर्जन जवळच्या ठिकाणी करता आले. विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये, तसेच जलस्रोतांचे प्रदूषण टाळता यावे, यासाठी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शहरातील विविध भागांत भक्तांची लगबग सुरू होती. घरगुती गणपतींचे विधिवत पूजन करून कुटुंबीयांनी गणरायाला निरोप दिला. काही ठिकाणी महिलांनी औक्षण करून, तर लहान मुलांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

विशेष म्हणजे यंदाच्या विसर्जन सोहळ्यात कर्कश आवाजाला फाटा देण्यात आला. डॉल्बीचा मोठा आवाज किंवा ध्वनिप्रदूषण करणाऱ्या साउंड सिस्टिमऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले. ढोल-ताशे, लेझीम, हलगी आणि टाळ-मृदंगाच्या साथीने काही मिरवणुका निघाल्याने गणेशोत्सवातील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडले. उत्साह कायम ठेवत ध्वनिप्रदूषण टाळण्याचा प्रयत्न नागरिक आणि गणेश मंडळांकडून करण्यात आला.

दीड, सहा आणि सात दिवसांच्या सहवासानंतर बाप्पाला निरोप देताना अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत विरहाचे भाव दिसून आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र, यंदाच्या विसर्जनाचे वैशिष्ट्य केवळ भक्तिभावापुरते मर्यादित राहिले नाही. कर्कश आवाजाला फाटा, पारंपरिक वाद्यांना प्राधान्य आणि कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर करत उत्सवाबरोबरच पर्यावरणाची जबाबदारी जपण्याचा संदेश पाचगणी परिसरातून देण्यात आला. ‘उत्सवही हवा आणि पर्यावरणाची काळजीही’ अशी भूमिका प्रत्यक्ष कृतीतून दिसून आली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूण १ अधिकारी, २४ पोलीस कर्मचारी आणि १९ होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. विसर्जन मार्ग, प्रमुख चौक, बाजारपेठ परिसर तसेच विसर्जनस्थळांवर पोलिसांची विशेष नजर होती.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers