पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिकतेसोबत सामाजिक जनजागृतीचा संदेश देण्याचा उपक्रम पाचगणी पोलीस ठाण्यात राबविण्यात आला आहे. गणरायाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेचा संदेश देणारा आकर्षक देखावा पोलीस ठाण्यात साकारण्यात आला असून, विविध जनजागृतीपर संदेश बॅनरच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.
सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत असताना पाचगणी पोलिसांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.डिजिटल अरेस्ट, सायबर क्राईम, क्रेडिट कार्ड फ्रॉड, कमी वेळेत कर्ज देण्याचे आमिष अशा विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून नागरिकांनी सतर्क राहावे, यासाठी बॅनरवर प्रभावी संदेश देण्यात आले आहेत.
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांना घाबरवून पैशांची मागणी करणे, बनावट लिंक पाठवून बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती मिळविणे, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक करणे तसेच कमी वेळेत मोठ्या रकमेचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा परिस्थितीत अनोळखी व्यक्तींना ओटीपी, पासवर्ड, एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि कोणत्याही दबावाला बळी पडू नये, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहरात नागरिकांसह पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी तसेच ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षेचा हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न पाचगणी पोलिसांनी केला आहे.
या जनजागृतीपर संदेशातून पोलिसांनी नागरिकांना धीर देतानाच सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत; सजग रहा, सुरक्षित राहा’ असा विश्वासाचा संदेश पाचगणी पोलिसांकडून देण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारण्यात आला असून, गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांचे या उपक्रमाकडे लक्ष वेधले जात आहे. बाप्पाच्या भक्तीसोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचा संदेश घराघरात पोहोचविण्याचा पोलिसांचा हा उपक्रम गणेशोत्सवातील सामाजिक जनजागृतीचे वेगळे उदाहरण ठरत आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे. याच भावनेतून पाचगणी पोलिसांनी ‘भक्तीसोबत सुरक्षा, उत्सवासोबत सजगता’हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला आहे.



