Home » पांचगणी » पाचगणीत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न ! महात्मा फुले विद्या मंदिराच्या संघांचे स्पर्धेवर वर्चस्व

पाचगणीत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न ! महात्मा फुले विद्या मंदिराच्या संघांचे स्पर्धेवर वर्चस्व

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : महाराष्ट्र राज्य शासन आणि सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाबळेश्वर तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पाचगणी येथील महात्मा फुले विद्या मंदिराच्या मैदानावर अत्यंत उत्साहात पार पडल्या. लाल मातीतील चढाई, पकडींचे उत्कृष्ट डावपेच, चपळाई आणि ताकदीच्या जोरावर दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत महात्मा फुले विद्या मंदिर व श्रीमती कांताबेन जे. पी. मेहता ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी चौफेर वर्चस्व गाजवत १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या दोन्ही गटांत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

​स्पर्धेचा शुभारंभ महात्मा फुले विद्या मंदिराच्या प्रांगणात क्रीडाप्रेमींच्या साक्षीने झाला. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश गोळे, ॲस्टन हॉस्टेलचे संस्थापक अमर बिरामणे, पूनम गोळे, इनर व्हील क्लब ऑफ पाचगणीच्या अध्यक्षा श्वेता बोधे आणि प्राचार्य डी. एल. मिर्झापूरे यांच्या हस्ते स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. महाबळेश्वर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील ५० हून अधिक शाळांच्या संघांनी यात सहभाग नोंदवल्याने क्रीडांगणाला जत्रेचे स्वरूप आले होते.

​पहिल्या दिवशी १४ व १७ वर्षांखालील मुली आणि १४ वर्षांखालील मुलांच्या गटात चुरशीचे सामने रंगले. मुलींच्या १७ व १९ वर्षांखालील गटात महात्मा फुले विद्या मंदिराच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत विजेतेपद मिळवले, तर भिलारचे हिलरेंज हायस्कूल आणि विस्डम हायस्कूलचे संघ उपविजेते ठरले. दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या गटात तब्बल २०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. यातही महात्मा फुले विद्या मंदिराच्या संघाने कौशल्याच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले. या गटात पाचगणीचे नचिकेत हायस्कूल आणि नॅशनल पब्लिक स्कूल उपविजेते ठरले. तर १४ वर्षांखालील मुलांच्या गटात महाबळेश्वरच्या अंजुमन खैरुल इस्लाम स्कूलने बाजी मारली.

​स्पर्धेला इनर व्हील क्लब ऑफ पाचगणी आणी शिवराज उद्योग समूह व शिवराज अॅग्रो टुरिझमचे  सहकार्य लाभले ​या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक दीपक पाटील, संघ व्यवस्थापक भगवानसिंह राजपूत, क्रीडा मार्गदर्शक राहुल कांबळे, निलेश सकपाळ, स्वप्ना केळकर, संदेश कासुर्डे, विशाल कासुर्डे व आकाश माने यांनी विशेष मेहनत घेतली. बक्षीस वितरण प्रसंगी प्राचार्य डी. एल. मिर्झापूरे, डॉ. सतीश देसाई, नरेश लोहारा, पूनम कांबळे, श्वेता बोधे, नितीन कळंबे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. सुनील कांबळे, प्रा. रामचंद्र वर्णे, प्रा. प्रविण कदम यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers