पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पर्यटननगरी पाचगणीत गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून सार्वजनिक शांतता कायम राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. यापूर्वी विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या परिसरातील सहा सराईत गुन्हेगारांवर गणेशोत्सव व विसर्जन कालावधीत पाचगणी शहर आणि परिसरात प्रवेश करण्यास कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.
पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही व्यक्तींवर यापूर्वी सण-उत्सवाच्या काळात शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गुन्हे, मारामारी, बेकायदेशीर दारू विक्री आणि खंडणी वसुली यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. ऐन उत्सवाच्या काळात अशा असामाजिक तत्त्वांमुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि भाविकांच्या सुरक्षेला बाधा पोहोचू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
ही कडक कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
संबंधित सहाही संशयितांना गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या संपूर्ण कालावधीत पाचगणी शहरात येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक आणि पाचगणी पोलीस या संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असणार आहेत. आदेशाचा भंग करून जर कोणीही शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी दिला आहे. गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.



