Home » जावळी » जावळीचा सुपुत्र दिल्लीत चमकला! रविंद्र गोळे लिखित ‘विश्वसंचार हिंदुत्वका’ ग्रंथाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते थाटात प्रकाशन

जावळीचा सुपुत्र दिल्लीत चमकला! रविंद्र गोळे लिखित ‘विश्वसंचार हिंदुत्वका’ ग्रंथाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते थाटात प्रकाशन

पांचगणी न्यूज नेटवर्क

​हातगेघर : जावळी तालुक्याच्या शिरपेचात आज आणखी एक सुवर्णपान खोवले गेले आहे. हातगेघर (ता. जावली) गावचे सुपुत्र आणि ‘साप्ताहिक विवेक’चे सह कार्यकारी संपादक श्री. रविंद्र गोळे यांनी लिहिलेल्या “विश्वसंचार हिंदुत्वका” या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते दिल्ली येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी अत्यंत दिमाखदार सोहळ्यात पार पडले. जावळीच्या ग्रामीण मातीत घडलेल्या एका लेखकाची साहित्यकृती थेट देशाच्या राजधानीत आणि उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशित होणे, हा संपूर्ण जावळी तालुक्यासह सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

​या विशेष प्रकाशन सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा ज्येष्ठ नेते खासदार श्री. विनोदजी तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ‘साप्ताहिक विवेक’चे मुख्य संपादक श्री. रमेश पतंगे, ज्येष्ठ विचारवंत श्री. दिलीप करंबेळकर यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, साहित्यिक आणि विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. रविंद्र गोळे यांनी आपल्या “विश्वसंचार हिंदुत्वका” या ग्रंथातून हिंदुत्व आणि भारतीय संस्कृतीचा जगभरात झालेला विस्तार, त्याची वैश्विक मुले आणि आधुनिक काळात जगाला मार्गदर्शक ठरणारे भारतीय विचारविश्व यांचा अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणात गोळे यांच्या लेखनशैलीचे आणि वैचारिक अभ्यासाचे कौतुक करत, हा ग्रंथ जागतिक स्तरावर भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

 

एका अत्यंत ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या आणि जावळीच्या मातीत जन्मलेल्या रविंद्र गोळे यांनी वृत्तपत्रसृष्टीत आणि वैचारिक साहित्य क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हे उत्तुंग यश संपादन केले आहे. दिल्लीच्या सत्ताकेंद्रात आणि देशातील सर्वोच्च पदांवरील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा जावळीच्या वैचारिक आणि सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देणारा ठरला आहे.

​रविंद्र गोळे यांच्या या उत्तुंग यशामुळे गोळे बंधू, हातगेघर ग्रामस्थ आणि संपूर्ण जावळी तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “जावळीच्या मातीतील विचारधारेने आज दिल्लीत दिमाखात प्रवेश केला आहे,” अशी भावना यावेळी स्थानिक नागरिकांनी आणि गोळे परिवाराने व्यक्त केली.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers