Home » सातारा » सातारा जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा बिगुल वाजला; म्हसवडमध्ये उद्यापासून रंगणार कुमार व कुमारी गटाचा थरार

सातारा जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा बिगुल वाजला; म्हसवडमध्ये उद्यापासून रंगणार कुमार व कुमारी गटाचा थरार

पांचगणी न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने सन २०२६-२०२७ या वर्षातील बहुप्रतिक्षित कुमार व कुमारी गट ‘जिल्हा अजिंक्यपद व राज्य अजिंक्यपद निवड चाचणी’ कबड्डी स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर आणि बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी ही भव्य स्पर्धा माणदेशी फौंडेशन, म्हसवड येथील अत्याधुनिक मॅटवर रंगणार आहे. जिल्ह्यातील उगवत्या कबड्डीपटूंना आपली क्रीडा कौशल्ये सिद्ध करण्याची आणि राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवण्याची ही सुवर्णसंधी मिळणार आहे.

​जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश पांडुरंग महाडीक आणि सचिव प्रणव अविनाश लेवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी कुमार गटाचे सामने रंगतील, तर बुधवारी ३० सप्टेंबर रोजी कुमारी गटाची रणधुमाळी पाहायला मिळेल. दोन्ही दिवशी सकाळी ठीक ९.३० वाजता सर्व सहभागी संघांना मैदानावर उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. या स्पर्धेतून सातारा जिल्ह्याचा अधिकृत संघ निवडला जाणार असल्याने जिल्ह्यातील नामांकित कबड्डी संघांमध्ये आणि खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

 

स्पर्धेतील पारदर्शकता आणि नियमांचे कडक पालन करण्यासाठी असोसिएशनने काही निकष निश्चित केले आहेत. कुमार गटासाठी ७५ किलो वजनाची मर्यादा आणि २० वर्षांखालील (०५ नोव्हेंबर २००६ व त्यानंतरचा जन्म) खेळाडू पात्र असतील. तर कुमारी गटासाठी ६५ किलो वजनाची मर्यादा आणि २० वर्षांखालील (३० नोव्हेंबर २००६ व त्यानंतरचा जन्म) खेळाडू सहभागी होऊ शकतील. प्रत्येक संघात कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त १४ खेळाडूंचा समावेश असणार आहे. सर्व सामने आधुनिक मॅटवर होणार असल्याने खेळाडूंना स्वतःचे ‘मॅट शूज’ आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची पात्रता पडताळणी कडक केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूने आपला शाळा सोडल्याचा दाखला (निर्गम उतारा), आधार कार्ड, १० वी किंवा १२ वीचे बोर्ड प्रमाणपत्र, मूळ जन्म दाखला आणि रंगीत फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. मूळ कागदपत्रांसह त्यांच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) सादर करणे अनिवार्य राहील.

​संघ नोंदणी फी रु. ३६०/- आणि प्रत्येक खेळाडूची नोंदणी फी रु. १५०/- निश्चित करण्यात आली असून, नोंदणी फी जमा न करणाऱ्या संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. ​

सातारा जिल्ह्याला कबड्डीची मोठी आणि दैदिप्यमान परंपरा लाभली आहे. या परंपरेला साजेसा खेळ म्हसवडच्या भूमीत पाहायला मिळणार आहे. स्पर्धा वेळेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष निलेश महाडीक आणि सचिव प्रणव लेवे यांनी असोसिएशनच्या वतीने केले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers