पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : जिद्द, शिस्त आणि मैदानावरील अचूक सांघिक समन्वयाच्या जोरावर विद्या निकेतन हायस्कूल, पाचगणीच्या १४ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विद्या निकेतनच्या मुलींनी तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले असून, या यशामुळे विद्या निकेतनच्या क्रीडा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील अनेक नामवंत शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीच्या साखळी सामन्यांपासूनच विद्या निकेतनच्या खेळाडूंनी आक्रमक सर्व्हिस आणि भक्कम ‘ब्लॉकिंग’च्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवले. उपांत्य फेरीत आणि त्यानंतरच्या तृतीय क्रमांकाच्या लढतीत प्रत्येक गुणासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार झुंज पाहायला मिळाली. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत संयम आणि जिद्द कायम ठेवत विद्या निकेतनच्या चिमुकल्या रणरागिणींनी सामना खिशात घातला.
विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशामागे शाळेचे प्राचार्य अथर्व बिरमणे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले. तसेच संस्थेच्या ॲडमिनिस्ट्रेटर स्वाती बिरमणे मॅडम यांनी खेळाडूंना पुरवलेल्या उत्तम सुविधा आणि दिलेले भक्कम पाठबळ विद्यार्थिनींसाठी ऊर्जा देणारे ठरले.
खेळाडूंच्या या यशाचा खरा पाया मैदानावर रचला तो क्रीडा शिक्षक नितीन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली. कडक शिस्त, नियमित सरावाचा तगादा, तांत्रिक बारकावे आणि प्रत्येक खेळाडूमध्ये निर्माण केलेला विजयाचा आत्मविश्वास यांमुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. “सरावातून कौशल्य, संघभावनेतून ताकद आणि जिद्दीतून यश!” या सूत्राचा अवलंब करत मुलींनी मैदानावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
या यशाबद्दल विजयी संघातील सर्व खेळाडूंचे शाळा व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षकवृंद आणि पालकवर्गाकडून कौतुक व अभिनंदन होत असून, पुढील जिल्हास्तरीय व विभागीय स्पर्धांसाठी त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



