पांचगणी न्यूज नेटवर्क
करहर : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी मानल्या जाणाऱ्या येथील श्रीराम विकास सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा स्थानिक श्रीराम मंदिरात अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेची पारदर्शकता आणि सभासदांचे हित जपण्यासाठी संस्था सदैव तत्पर असून, आगामी काळात सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्जवाटप वाढवण्यासोबतच विविध विकासकामे राबवण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला. तसेच, पावसाने ओढ दिल्याने पिके जळून खाक झाली असतानाही जावळी तालुक्याला शासकीय दुष्काळाच्या यादीतून वगळल्याबद्दल तीव्र असंतोष व्यक्त करत, तालुक्याचा तातडीने दुष्काळात समावेश करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सभेच्या प्रारंभी संस्थेच्या दिवंगत सभासदांना दोन मिनिटांचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर श्री. रामदास गलगले यांनी उपस्थितांचे आपुलकीने स्वागत करून प्रास्ताविक मांडले. संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा, जमा-खर्चाचा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा यावेळी सभासदांसमोर ठेवण्यात आला.
सभेत मार्गदर्शन करताना संचालक चंद्रकांत पाडळे (सर) यांनी संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तर वालुथ सोसायटीचे व्हाईस चेअरमन मधुकर पोफळे (सर) यांनी संस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि सभासदांच्या गरजा भागवण्यासाठी कर्जपुरवठा वाढवण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थापक-चेअरमन वसंतराव पोफळे यांनी संस्थेच्या वाटचालीवर विश्वास व्यक्त केला. “श्रीराम विकास सेवा सोसायटीने अत्यंत अल्प कालावधीत परिसरात आपले स्वतंत्र आणि मजबूत अस्तित्व निर्माण केले आहे. शेतकरी सभासदांची आर्थिक प्रगती हाच आमचा मुख्य ध्यास असून, प्रतिकूल परिस्थितीतही संस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित सभासदांनीही संस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करत भविष्यातील वाटचालीसाठी सकारात्मक सहकार्याची भूमिका मांडली.
जावळी तालुक्यात दुष्काळ जाहीर करा!
यावर्षी पावसाने मोठी ओढ दिल्याने उन्हाच्या तीव्र झळा आणि पाण्याचा तुटवडा यामुळे जावळी तालुक्यातील उभी पिके करपून गेली आहेत. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असतानाही, राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी यादीतून जावळी तालुक्याला वगळल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप पाहायला मिळत आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत, शासनाने कोणताही दुजाभाव न करता जावळी तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असा कडक ठराव या सभेत एकमुखाने संमत करण्यात आला.
या वार्षिक सभेस व्हाईस चेअरमन लक्ष्मण पाडळे (आबा), संचालक चंद्रकांत पाडळे, रामदास गलगले, राजेंद्र चव्हाण, आनंदराव कदम, दत्तात्रय गोळे, हेमंत गोळे, सौ. संगीता पाडळे, सौ. सुभद्रा पोफळे हे सर्व संचालक उपस्थित होते. तसेच सरपंच श्रीरंग गलगले, माजी सरपंच नारायण गलगले, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक पाडळे यांच्यासह इतर सर्व मान्यवर आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संचालक राजेंद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली.



