Home » पांचगणी » भिलारची कन्या चैताली भिलारेची आंतरराष्ट्रीय श्लोक स्पर्धेत सुवर्णमय घोडदौड; मुंबई विभागीय फेरीत मारली धडक

भिलारची कन्या चैताली भिलारेची आंतरराष्ट्रीय श्लोक स्पर्धेत सुवर्णमय घोडदौड; मुंबई विभागीय फेरीत मारली धडक

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : चिन्मय मिशनतर्फे आयोजित अत्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय श्लोक स्पर्धेच्या मुंबई विभाग पूर्व फेरीत पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरुळ (नवी मुंबई) येथील विद्याभवन शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृत वाणीने आणि उत्कृष्ट श्लोक पठणाने यशाचा झेंडा फडकवला आहे. विविध गटांतून तब्बल १८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत दणदणीत यश संपादन करत शाळेचा आणि आपल्या भागाचा गौरव वाढवला आहे. यामध्ये पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार येथील सुकन्या चैताली गणेश भिलारे हिने आपल्या अमोघ श्लोक पठणाच्या जोरावर मुंबई विभागीय अंतिम स्पर्धेसाठी निवड प्राप्त केली आहे.

​भारतीय संस्कृतीची मुळे घट्ट करणारी, संस्कृत भाषेची गोडी वाढवणारी आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांचे सिंचन करणारी ही आंतरराष्ट्रीय श्लोक स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. यामध्ये नेरुळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी आपल्या लयबद्ध आणि स्पष्ट उच्चारांनी परीक्षकांची मन जिंकली. भिलार येथील ज्येष्ठ नागरिक यशवंत गेनू भिलारे यांची नात आणि गणेश भिलारे यांची कन्या चैताली हिने या स्पर्धेत मिळवलेल्या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण भिलार आणि महाबळेश्वर परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

​या स्पर्धेत चैताली भिलारे हिच्यासह शौर्यानी प्रशांत माने, ओवी विशाल पवार, महेश कृष्णचंद्र गिरी, श्लोक अविनाश कुलकर्णी, शुभ्रा सुभाष झनकर, तनुष देवेंद्र पाटील, अभिराज राजेश पानसरे, प्रिन्स प्रसन्नकुमार कांबळे, स्वरा जितेंद्र फोफाळे, वर्निका मिलिंद कदम, श्रेया तात्यासो कलांगे, अस्मी अमित कांबळे, प्रणाली प्रसन्नकुमार कांबळे आणि स्वाती ज्योती मिश्रा यांनी विविध पारितोषिके पटकावून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. तर श्रिया सुरज धांद्रूत आणि प्राची लहू भोसले यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर शिक्षकांनीही आपल्या कौशल्याचा परिचय देत शिक्षक गटातून शिक्षिका पौर्णिमा अभिजीत कोकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिक प्राप्त केले.

​पूर्व फेरीतील या चमकदार कामगिरीच्या जोरावर चैताली गणेश भिलारे, शौर्यानी प्रशांत माने आणि तनुष देवेंद्र पाटील या तीन गुणवंत विद्यार्थ्यांची पुढील टप्प्यातील मुंबई विभागीय फेरीत निवड झाली आहे.

​छोट्या वयात संस्कृत श्लोकांचे शुद्ध उच्चार, पाठांतर आणि सादरीकरण या जोरावर चैतालीने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामागे तिचे आई-वडील, घरातील पाठींबा, शाळेतील शिक्षक आणि मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य लाभले. आगामी मुंबई विभागीय स्पर्धेतही चैताली आणि तिचे सहकारी विद्यार्थी आपल्या कौशल्याच्या जोरावर यश मिळवून महाबळेश्वर तालुक्याचे नाव उज्ज्वल करतील, असा सार्थ विश्वास भिलार ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

​सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षिका पौर्णिमा कोकरे यांचे पुणे विद्यार्थी गृहाचे कुलसचिव दिनेश मिसाळ, विद्याभवन संकुलातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विशेष अभिनंदन केले असून मुंबई विभागीय फेरीसाठी सर्व स्पर्धकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers