पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : आपल्या जन्मभूमीचे ऋणांनुबंध जपून व्यवसायात यश मिळवल्यानंतरही गावातील मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार लावणे, हेच खऱ्या अर्थाने समाजाचे देणे फेडणे असते. याचाच अत्यंत प्रेरणादायी वस्तुपाठ काटवलीतील एका माजी विद्यार्थ्याने घालून दिला आहे.
प्राथमिक शाळा काटवलीचे माजी विद्यार्थी, यशस्वी युवा उद्योजक प्रणय अमृत बेलोशे यांनी आपला मुलगा कु. राया प्रणय बेलोशे याच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वाटप केले. त्यांच्या या अत्यंत विधायक, सामाजिक आणि कौतुकास्पद उपक्रमाचे काटवली परिसर व शिक्षण वर्तुळातून भरभरून स्वागत होत आहे.
प्राथमिक शाळा काटवलीच्या प्रांगणात हा विशेष कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि स्नेहाच्या वातावरणात पार पडला. सामान्यतः वाढदिवसाच्या निमित्ताने केला जाणारा अनावश्यक खर्च टाळून, आपल्याच जन्मगावातील आणि शिकलेल्या शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने बेलोशे कुटुंबाने हा उपक्रम राबवला. स्वतःच्याच शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या एका यशस्वी उद्योजकाकडून हे प्रेमळ सरप्राइज मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वहागांव शाळेचे माजी मुख्याध्यापक भिकू कोंडीबा बेलोशे हे उपस्थित होते. तर माजी सरपंच आणि रायाचे आजोबा अमृत भिकू बेलोशे, प्रणय बेलोशे कुटुंबीय आणी शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक आदी ग्रामस्थ उपास्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



