पांचगणी न्यूज नेटवर्क
सौदरी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना वाव मिळण्यासाठी क्रीडा स्पर्धा अत्यंत प्रभावी माध्यम ठरतात. खेळाची आवड निर्माण व्हावी, क्रीडा कौशल्यांची पारख होऊन विद्यार्थ्यांना पुढील स्तरावर योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळावे, या उदात्त उद्देशाने सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धांचे’ आयोजन करण्यात येते. याच मालिकेतील पहिला टप्पा असणारी येरणे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौदरी येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडली.
या क्रीडा महोत्सवात येरणे केंद्रातील तब्बल १२ प्राथमिक शाळांमधील शेकडो बालखेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केंद्रप्रमुख अमोल कुंभार, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक संजय संकपाळ तसेच केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक बाळकृष्ण कदम, राजेंद्र जाधव व शाम चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
स्पर्धेचे शिस्तबद्ध आणि नेटके नियोजन तालुका क्रीडा समन्वयक योगेश जाधव व केंद्र क्रीडा समन्वयक गणेश पोटे यांनी केले होते. लहान व मोठ्या गटात (मुले व मुली) विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धावणे, लंगडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक यांसारख्या ॲथलेटिक्स स्पर्धांसोबतच कबड्डी, रस्सीखेच यांसारखे पारंपरिक सांघिक खेळ आणि बुद्धीबळासारख्या बौद्धिक खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धा निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पंच म्हणून गणेश पडवळ, मंगेश मोकाशी, संध्या ताकवले व निलम साळुंखे यांनी काम पाहिले. तर सचिन मिसाळ, शंकरराव खाडे, नवनाथ पाटील आणि माधव शिंदे यांनी गुणलेखनाची जबाबदारी चोख बजावली.
आपल्या पाल्यांचा आणि स्थानिक शाळांच्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी सौदरी ग्रामस्थ आणि पालकांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. लहानग्या खेळाडूंचा जोश, विजय मिळवल्यानंतरचा आनंद आणि खिलाडूवृत्ती पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर सर्व विजयी व सहभागी बालखेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.



