पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या महाबळेश्वर तालुक्याच्या एरवी शांत राहणाऱ्या हवेत सध्या राजकीय उष्णता भलतीच वाढली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एसडीसीसी) निवडणुकीमुळे तालुक्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून सलग दोन वेळा बिनविरोध निवडून येत सहकारातील आपली ताकद सिद्ध करणारे विद्यमान संचालक राजेंद्र शेठ राजपुरे हे यंदा बिनविरोध ‘चौकार’ साधणार की त्यांना संघर्षाच्या मैदानात उतरावे लागणार, या एकाच प्रश्नाने महाबळेश्वरसह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही वर्षांत शिवसेनेने आपली पाळेमुळे घट्ट करत राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमटलेले सत्तासंघर्षाचे पडसाद आता थेट जिल्हा बँकेच्या रणसंग्रामात दिसू लागले आहेत. या निवडणुकीत सहकारातील अनुभवी नेतृत्व राजेंद्र शेठ राजपुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या पत्नी सौ. रूपालीताई राजपुरे यांनीही अर्ज भरला आहे.
राजेंद्र शेठ राजपुरे हे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांचे खंदे व कट्टर समर्थक मानले जातात. मकरंद आबांच्या माध्यमातून तालुक्यातील सहकार क्षेत्रावर त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली आहे. मात्र, दुसरीकडे महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजय मोरे यांनी तगडे आव्हान उभे करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय समीकरणांची मोठी उलथापालथ झाली आहे. संजय मोरे हे शिवसेनेचे पदाधिकारी असून त्यांच्या पाठीशी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरदहस्त असल्याने या निवडणुकीतील रंगत आणि राजकीय ताकद कमालीची वाढली आहे.
एकेकाळी सहकारतज्ज्ञ स्व. बाळासाहेब भिलारे यांच्याकडे दीर्घकाळ असणारे जिल्हा बँकेचे नेतृत्व राजेंद्र शेठ राजपुरे यांनी आपल्या मुत्सद्दीपणाने आणि कौशल्याने स्वतःकडे खेचून आणले होते. सर्वसमावेशक कार्य, थेट संपर्क आणि सभासदांशी जपलेले घट्ट नाते याच्या जोरावर त्यांनी सलग तीन टर्म बिनविरोध बाजी मारली होती. आता ते चौकार मारण्याच्या तयारीत आहेत; मात्र यंदाच्या निवडणुकीत राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचली आहे. वरिष्ठ पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीत राजकीय तडजोडींच्या चर्चा सुरू असल्या, तरी स्थानिक पातळीवर मात्र निवडणुकीची जोरदार रणधुमाळी उडाली आहे.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय नेत्यांच्या दारी ‘जोर-बैठका’ सुरू झाल्या होत्या, तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ नेत्यांची मानधरणी करीत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. प्रस्थापितांना धूळ चारण्याचे मनसुबे आखत अनेक गुप्त बैठका पार पडल्या आहेत. मात्र, प्राप्त माहितीनुसार बहुमताचा आकडा राष्ट्रवादीच्या राजे गटाकडे झुकता असल्याने मोठ्या राजकीय ‘पॅकेज’च्या चर्चा आता हवेत विरून जाऊ लागल्या आहेत. त्यामुळेच काही मतदार अचानक ‘सहलीवर’ गेल्याची चर्चा रंगल्याने निवडणुकीतील सस्पेन्स आणि गांभीर्य अधिकच वाढले आहे.
शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या या बँकेत आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते निष्ठेची पराकाष्ठा करत आहेत. एका बाजूला मकरंद आबांचे कट्टर समर्थक राजेंद्र शेठ राजपुरे यांची सहकारातील दीर्घ कारकीर्द व जनसंपर्क पणाला लागला आहे, तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरदहस्ताने नव्या नेतृत्वाची आकांक्षा धरून संजय मोरे यांनी दिलेले रोखठोक आव्हान आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने अखेरच्या क्षणी ‘बिनविरोध’चा तोडगा निघणार की महाबळेश्वरचा हा राजकीय पट पूर्ण रणसंग्रामात बदलणार, याचा फैसला आता काही दिवसांतच होणार आहे.



