Home » पांचगणी » कर्तृत्व, जिद्द अन् लोकसेवेचा ध्यास: नगरसेवक गणेश शांताराम कासुर्डे यांची संघर्षगाथा

कर्तृत्व, जिद्द अन् लोकसेवेचा ध्यास: नगरसेवक गणेश शांताराम कासुर्डे यांची संघर्षगाथा

​“ध्येयाने प्रेरित झालेल्या माणसाला अपयशाचे अडथळे रोखू शकत नाहीत,कारण त्याच्या रक्तात पराभवावर मात करून जिंकण्याची जिद्द असते!” पाचगणीच्या राजकारणात आणि समाजकारणात आज एका नावाची चर्चा अग्रक्रमाने होते, ते नाव म्हणजे युवा नेतृत्वाची नवी ओळख गणेश शांताराम कासुर्डे. समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची तळमळ, संकटात धावून जाण्याची वृत्ती आणि सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ, याच्या जोरावर गणेशराव यांनी आज आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. आज त्यांचा वाढदिवस यानिमित्ताने हा प्रपंच..

 

​गणेशराव यांचे वडील नगरपालिकेत सेवेत होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना नगरपालिकेचे कामकाज, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक परिस्थितीचे जवळून दर्शन झाले. वडील सेवेत असताना गणेश यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनीही काही काळ नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात नोकरी केली. या नोकरीच्या काळात त्यांनी केवळ कर्तव्य बजावले नाही, तर ‘स्वच्छ आणि सुंदर पाचगणी’ घडवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली.

​याच मेहनतीचे फळ म्हणून पाचगणी नगरपालिकेला देश पातळीवरील अनेक स्वच्छतेचे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आणि या ऐतिहासिक क्षणाचे गणेश कासुर्डे प्रत्यक्ष साक्षीदार ठरले. देशाची राजधानी नवी दिल्ली येथे जाऊन पुरस्कार स्वीकारण्याचे दुर्मिळ आणि अभिमानास्पद भाग्यही त्यांना लाभले.

 

​नोकरीच्या चौकटीत राहून समाजसेवा करण्याला मर्यादा असतात, हे ओळखून गणेश यांनी थेट लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरताना समोर दिग्गजांचे आव्हान होते. निवडणूक सोपी नव्हती, पण त्यांनी तुफानी आणि झंजावती प्रचार केला. कडवी झुंज दिली, मात्र निसटता पराभव पदरी आला.

​अनेकदा अपयशाने लोक खचून जातात किंवा मागे हटतात, पण गणेशराव वेगळ्या मातीचे बनले होते. त्यांनी पराभवाने खचून न जाता दुप्पट वेगाने काम सुरू ठेवले. त्यांची हीच जिद्द, चिकाटी आणि नागरिकांशी असलेली अथांग निष्ठा पाहून नगरपालिकेत त्यांची ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून निवड करण्यात आली.

​“पराभवाने ज्याचे मनोबल खचत नाही, यश शेवटी त्यालाच झुकून मुजरा करते!” या उक्तीनुसार ​​स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळताच त्यांनी पाचगणी शहराच्या विकासासाठी स्वतःला झोकून दिले. रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, पर्यटन आणि युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रशासकीय अनुभवाचा पूर्ण वापर केला. त्यांच्या या धडाडीच्या कामाची पावती म्हणजेच, त्यांना नगरसेवक पदावर पुन्हा एकदा काम करण्याची संधी देण्यात आली. हा त्यांच्या सातत्यपूर्ण कामाचा आणि लोकसेवेचा मिळालेला एक मोठा गौरवच आहे. ​आज कार्यकर्ता ते यशस्वी लोकप्रतिनिधी असा त्यांचा प्रवास पाचगणीतील हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.​“लोकांचे मिळवले प्रेम आणि विश्वास,हाच गणेशरावांच्या यशाचा खरा ध्यास!” आहे

​आज गणेश शांताराम कासुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचगणीतील नागरिक, स्नेही आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या हातून पाचगणी शहराच्या विकासाची आणखी भव्य कामे होवोत आणि त्यांचा हा सामाजिक-राजकीय प्रवास असाच यशाच्या शिखरावर पोहोचत राहो, हीच मनोमन सदिच्छा!

सचिन टक्के, भिलार

 

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers