Home » पांचगणी » संजीवन विद्यालयाचा फुटबॉलमध्ये ‘झंझावाती’ विजय; १४ संघांना मात देत रायझिंग स्टार चॅम्पियन कपवर कोरले नाव!

संजीवन विद्यालयाचा फुटबॉलमध्ये ‘झंझावाती’ विजय; १४ संघांना मात देत रायझिंग स्टार चॅम्पियन कपवर कोरले नाव!

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी  : येथील नामांकित संजीवन विद्यालयाच्या १७ वर्षांखालील (U-17) फुटबॉल संघाने आपल्या आक्रमक आणि वर्चस्वपूर्ण खेळाच्या जोरावर ‘पद्मश्री डॉ. झाहीर ई. काझी रायझिंग स्टार फुटबॉल चॅम्पियन कप’ स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. अटीतटीच्या रंगलेल्या या स्पर्धेत तब्बल १४ बलाढ्य संघांनी सहभाग नोंदवला होता. मात्र, सर्व सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवत संजीवन विद्यालयाने विजेतेपदाचा चषक उंचावून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

 

​स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात संजीवनच्या खेळाडूंनी आक्रमक सुरुवात करत सिल्व्हर डेल हायस्कूलचा ५-० असा धुव्वा उडवला. या सामन्यात अर्णव सिंगने दोन, तर सुदीप सुंटी, वेदांत वाघमोडे आणि संचित लोळे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत स्कॉलर फाउंडेशनविरुद्ध रंगलेल्या रोमहर्षक लढतीत एरोन चक्रवर्तीने अखेरच्या क्षणी मारलेल्या निर्णायक गोलमुळे संजीवनने १-० अशी बाजी मारली.

 

​उपांत्य फेरीत बिलीमोरिया संघाविरुद्ध सुदीप सुंटीने केलेल्या अप्रतिम गोलच्या जोरावर संजीवनने १-० ने विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात गोलरक्षक स्वस्तिनम काटे याने केलेली भक्कम तटबंदी विशेष उल्लेखनीय ठरली. अंतिम सामन्यात संजीवनच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा मैदानावर वर्चस्व गाजवत विद्यानिकेतन हायस्कूलचा ४-० असा दणदणीत पराभव केला. अंतिम लढतीत अर्णव सिंगने दोन, तर वेदांत वाघमोडे आणि संचित लोळे यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

​सांघिक यशासोबतच वैयक्तिक पुरस्कारांमध्येही संजीवनच्या खेळाडूंनी ठसा उमटवला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल अर्णव सिंग याला ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ तर स्वस्तिनम काटे याला ‘सर्वोत्कृष्ट गोलकीपर’ म्हणून गौरविण्यात आले. क्रीडा प्रशिक्षक दत्ता जांभूळकर यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन, खेळाडूंची शिस्त आणि जिद्द यामुळेच हे यश शक्य झाल्याचे क्रीडावर्तुळातून बोलले जात आहे.

 

​विद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती शशिताई ठकार यांनी “हा क्षण संजीवन विद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद असून खेळाडूंच्या सांघिक भावनेमुळेच हे यश मिळाले,” अशा शब्दांत खेळाडूंचे कौतुक केले. याशिवाय व्यवस्थापकीय संचालिका अनघा देवी, नगरसेवक प्रवीण बोधे, प्राचार्य धनंजय शिरूर, मुख्याध्यापिका नेहा शहा, आयजीसीएसई विभागप्रमुख क्लॅरिस्टा डिसिल्वा, सीबीएसई मॅनेजर पीयूष शहा, क्रीडा व्यवस्थापक सचिन कांबळे, अकॅडेमिक हेड पौर्णिमा पाटील आणि सांस्कृतिक विभागप्रमुख आकांक्षा बोंगाळे यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers