पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : अंजुमन स्कूलतर्फे आयोजित अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘डॉक्टर काझी कप’ फुटबॉल स्पर्धेत पाचगणी येथील नामांकित बिलीमोरिया हायस्कूलच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट, शिस्तबद्ध आणि आक्रमक खेळाच्या जोरावर देदीप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत बिलीमोरिया हायस्कूलच्या विविध वयोगटांतील संघांनी चमकदार कामगिरी करत मैदानावर पूर्णपणे आपले वर्चस्व सिद्ध केले.
स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या गटात बिलीमोरिया हायस्कूलच्या संघांनी प्रतिस्पर्धी संघांना पराभवाचा धक्का देत दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावून अजिंक्यपद आपल्या नावे केले. मुलींच्या आक्रमक चढाया आणि भक्कम बचावाच्या जोरावर त्यांनी स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. दुसरीकडे, १४ वर्षांखालील मुलांच्या गटातही बिलीमोरियाच्या बालचमूंनी अत्यंत चुरशीची लढत देत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि संपूर्ण स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत उपविजेतेपदावर आपले नाव कोरले.
शालेय क्रीडा जगतात बिलीमोरिया हायस्कूलच्या खेळाडूंनी उंचावलेल्या या यशाच्या ध्वजामुळे संपूर्ण शहरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खेळाडूंचे क्रीडा कौशल्य, अथक परिश्रम आणि सांघिक जिद्दीच्या जोरावरच हे घवघवीत यश शक्य झाले आहे.या शानदार यशाबद्दल संस्थेच्या संचालिका आदिती गोरडिया, पियुष कामदार, शाळेचे मुख्याध्यापक प्रतीक गुप्ता तसेच क्रीडाशिक्षक राहुल कांबळे यांनी सर्व विजयी संघांचे, खेळाडूंचे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे विशेष अभिनंदन केले असून पुढील क्रीडा प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.



