Home » जावळी » हातगेघर-कावडी उपसा सिंचन योजना तत्काळ कार्यान्वित करा; वाळणाऱ्या भातशेतीला पाणी देण्यासाठी श्रीहरी गोळे आक्रमक!

हातगेघर-कावडी उपसा सिंचन योजना तत्काळ कार्यान्वित करा; वाळणाऱ्या भातशेतीला पाणी देण्यासाठी श्रीहरी गोळे आक्रमक!

पांचगणी न्यूज नेटवर्क ​
करहर :पावसाच्या ओढीमुळे संकटात सापडलेल्या भातशेतीला वाचवण्यासाठी हातगेघर धरणावर उभारण्यात आलेली मात्र अद्याप पूर्णतः कार्यान्वित नसलेली कावडी उपसा सिंचन योजना (लिफ्ट इरिगेशन स्कीम) पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी जोरदार मागणी भाजप जावली तालुक्याचे माजी अध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी केली आहे. सातारा सिंचन विभागाच्या उपअभियंता श्रीमती क्षितीजा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांनी यासंदर्भात निवेदन दिले व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

​या मागणीची गांभीर्याने दखल घेत उपअभियंता श्रीमती गायकवाड यांनी तत्काळ सहाय्यक अभियंता श्री. बामणे यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे पथक घटनास्थळी रवाना केले. या पथकाने हातगेघर परिसरात बंद अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनेची पाहणी केली. तसेच पावसाअभावी सुकत चाललेल्या भातपिकांची आणि क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली.

​यावेळी बोलताना श्रीहरी गोळे म्हणाले की, ही योजना तत्काळ सुरू झाल्यास परिसरातील जवळपास १०० एकर क्षेत्रातील भातशेती करपण्यापासून वाचणार आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेली कामे येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.

​या पाहणीप्रसंगी माजी पोलिस पाटील सर्जेराव गोळे आबा, तुकाराम गोळे महाराज, ग्रामपंचायत सदस्य संदीप गोळे, विलास गोळे, सुनील गोळे यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंचन विभागाने यावर तातडीने कार्यवाही न केल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र लढा उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers