पांचगणी न्यूज नेटवर्क
मेढा : जावली तालुक्यात काही लोकांची दहशत सुरु झाली असून त्याला कारणीभुत आहे. तालुक्यातील अवैध धंदे, अवैध उत्खनन. त्यामुळे जावली तालुक्याचा बीड होवू नये यासाठी प्रशासनाने तालुक्यात अवैध विनापरवाना उत्खनन करून शासनाचा कर बुडवून मालामाला होणाऱ्या “आकाला ” वेळीच चाफ लावावा. या मागणीचे निवेदन जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने तहसिलदार प्रविण मुगदुल यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदना वरून व पदाधिकाऱ्यांनी सांगतिलेल्या माहितीवरून , जावली तालुक्यात काही लोकांची मनमानी सुरु आहे. हेच लोक समाजात दहशत निर्माण करीत आहेत. याला कारण म्हणजे तालुक्यातील अवैध धंदे व अवैध विनापरवाना सुरु असलेले उत्खनन.. सध्या प्रतापगड साखर कारखान्याच्या आवारात खाजगी शेत जमिनीमध्ये काही व्यक्तींनी कोणत्याही शासकिय परवानगी शिवाय आणि गौण खनिजाची रॉयल्टी न भरता अनाधिकृत मुरूम, माती, दगडाचे उत्खनन सुरु केलेले आहे. त्याच बरोबर करंदी तर्क कुडाळ व तालुक्याच्या अन्य विभागात उत्खनन सुरु आहे.
सदर च्या उत्खननामुळे शासनाचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर शासनाचा महसुलही बुडत आहे. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम आणि गौण खनिज उत्खनन नियमानुसार हे बेकायदेशीर आहे. तरी सदर ठिकाणची स्थळ पाहाणी करून पंचनामा करावा.व अनधिकृत उत्खनन तात्काळ बंद करण्यात यावे. केलेल्या उत्खननाचा दंड वसुल करावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अनाधिकृत गौण खनिज उत्खननाची पाहाणी करत असताना आमच्या एका कार्यकर्त्याचा पाठलाग करून त्याला दमबाजी करण्याचा प्रयत्न झाला. तरी बीड सारखी परिस्थिती जावली तालुक्यात निर्माण होत आहे. कोणीतरी वाल्मिक कराड बनण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा गुंड प्रवृत्तींना प्रशासनाने वेळीच पायबंद घालावा. अन्यथा जावली तहसिल कार्यालया समोर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिनजी गोगावले यांच्या नेत्तृत्वाखाली सदरचे निवेदन तहसिलदार प्रविण मुगदुल यांना देण्यात आले या प्रसंगी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष – सुरेश पार्टे, उपाध्यक्ष गोपाळराव बेलोशे, जिल्हा उपाध्यक्ष रोहित नवसरे, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष – सुनिल फरांदे, युवा नेते प्रमोद पवार, रोहित रोकडे, प्रविण गुजर -पाटील, गणेश निकम, राम कदम,नरेश पवार, प्रविण मोहिते, बापु दुर्गावळे, मोहन देशमुख, नामदेव पाटणे आदी मान्यवर उपस्थिति होते. सर्वांच्या निवेदनावर सह्या असून योग्य ती प्रशासकिय कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
संबधीत उत्खननाचा पंचनामा करून योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन तहसिलदार प्रविण मुगदुल यांनी यावेळी दिले.



