पांचगणी न्यूज नेटवर्क
”मातीतून माणसाला घडवणारा शिक्षक आणि अंतःकरणात भक्ती जपवणारा थोर आत्मा कधीच कालवश होत नाही; त्यांच्या आठवणी संस्कारारूपाने युगानुयुगे जिवंत राहतात…”
काही व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात; पण त्यांनी दिलेले संस्कार, प्रेम आणि आठवणी कायम मनाच्या गाभाऱ्यात जिवंत राहतात. रांजणी (ता. जावली) येथील आदरणीय कै. भीमराव रांजणे (गुरुजी) हे असेच एक उत्तुंग आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व! आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन. गुरुजी आपल्यात नसल्याची जाणीव मनाला व्याकूळ करते, त्यांच्या प्रेमळ शब्दांची, मार्गदर्शनाची आणि सहवासाची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते; परंतु त्यांचे कर्तृत्व आणि संस्कार आपल्यासाठी सदैव दिशादर्शक ठरत आहेत.
स्वातंत्र्यसैनिकाचा वारसा आणि ४० वर्षांचे ज्ञानदान
कै. भीमराव रांजणे गुरुजींना सामाजिक सेवेचे आणि देशभक्तीचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. त्यांचे वडील स्व. भाऊसाहेब बळवंत रांजणे हे खंदे स्वातंत्र्यसैनिक होते. आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून गुरुजींनीही आपले संपूर्ण आयुष्य समाजोपयोगी कार्यासाठी आणि ज्ञानदानासाठी अर्पण केले.
- सन १९६० मध्ये त्यांनी केडंबे येथून आपल्या शैक्षणिक सेवेचा श्रीगणेशा केला. त्यानंतर बेलोशी, शिंदेवाडी, दापवडी आणि महू यांसारख्या दुर्गम व ग्रामीण भागांतील शाळांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवले. ज्ञानासोबतच शिस्त, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये आणि माणुसकीचे संस्कार त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवले. ४० वर्षांच्या निष्कलंक व तळमळीच्या सेवेनंतर सन २००० मध्ये ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. आज त्यांचे अनेक विद्यार्थी देश-परदेशात आणि विविध उच्च पदांवर कार्यरत असून, गुरुजींच्या संस्कारांचा सुगंध पसरवत आहेत.

भक्तीची ओढ आणि सामाजिक नेतृत्व
शिक्षकी पेशा सांभाळत असतानाच गुरुजींचा सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील सहभाग मोठा होता. वै. दत्तात्रय कळंबे महाराज यांच्या पावन सहवासाने गुरुजींचे जीवन भक्तिरसाने न्हाऊन निघाले होते. या अध्यात्मिक सहवासामुळे ते भजनामध्ये पूर्णपणे तल्लीन होत असत. वारकरी संप्रदायाचा वारसा जपत त्यांनी पंढरपूरची वारीही अखंडपणे केली. स्थानिक भजन मंडळाचे सक्रिय सदस्य म्हणून जीवनपटाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते भजन आणि भक्तीत तल्ललीन राहिले.
यासोबतच ‘महात्मा फुले गृहनिर्माण संस्था, पांचगणी’ आणि ‘करहर येथील कृषी संस्था’ चे संचालक म्हणून त्यांनी अत्यंत समर्थपणे काम पाहिले. गावाचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, या तळमळीने त्यांनी सामाजिक सेवेत कायम पुढाकार घेतला.
आदर्शाचा वस्तुपाठ आणि कौटुंबिक समृद्धी
शिक्षक म्हणून समाजाला दिशा देतानाच, गुरुजींनी कौटुंबिक आयुष्यातही प्रेम, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचा एक वस्तुपाठ निर्माण केला. कुटुंबातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी अत्यंत आधारवड ठरले. आज त्यांची दोन्ही मुले आपापल्या व्यवसायात अत्यंत यशस्वी आणि स्थिरस्थावर झाली असून, वडिलांचे संस्कार पुढे चालवत आहेत.
माणूस निघून जातो, पण त्याने कमावलेले पुण्य, दिलेले संस्कार आणि केलेले कार्य कधीच संपत नाही. कै. भीमराव रांजणे गुरुजींचे जीवन आणि विचार पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहतील. प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ गुरुजींच्या पावन स्मृतीस आणि निरपेक्ष जीवनकार्यास ‘पांचगणी न्यूज’ परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली!



