सान्वी गंभीर प्रथम; फोर फ्रेंड्स कॅरम अकॅडमी आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने पाचगणीच्या खेळाडूंचा डंका
पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत पाचगणी येथील ज्ञानगंगा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्य आणि कौशल्याचा परिचय देत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या ज्ञानगंगा हायस्कूलच्या चार गुणवंत विद्यार्थ्यांची विभागीय (झोनल) स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सान्वी जयंत गंभीर हिने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. तर १७ वर्षांखालील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मुलींच्या गटात खुशी जमीर पटेल हिने पाचवा आणि सानिया कुतुबुद्दीन नदाफ हिने सहावा क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले. याचप्रमाणे १७ वर्षांखालील मुलांच्या गटात श्लोक अतिश भुजबळ याने अटीतटीच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळ करत पाचवा क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्रशिक्षक कामरान खान सर आणि क्रीडा शिक्षक इक्बाल डांगे यांचे परिश्रमपूर्वक प्रशिक्षण लाभले. तसेच ‘फोर फ्रेंड्स कॅरम अकॅडमी, पाचगणी’ यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि कॅरमचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य व उपकरणे मिळाल्यामुळे खेळाडूंची तयारी अधिक भक्कम झाली. ज्ञानगंगा हायस्कूल शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडागुणांना नेहमीच प्रोत्साहन देत आले आहे. सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी कौतुक केले असून विभागीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



