रश्मी चौकातील रस्ता बनतोय ‘डेथ ट्रॅप’; प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची पर्यटकांसह स्थानिकांची मागणी
पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पांचगणी -महाबळेश्वर या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र ते संजीवन नाका दरम्यान नव्याने करण्यात आलेले सिमेंट काँक्रिटीकरण वाहनचालकांसाठी सोयीचे ठरत असले, तरी रश्मी चौक (बेबी पॉईंट) परिसरातील तीव्र आणि धोकादायक वळण मात्र वाहनधारकांच्या जिवावर बेतण्याची भीती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळी या वळणाचा अंदाज न आल्याने एका ट्रकचा रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी वा दुखापत झाली नाही, मात्र या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पाचगणी आणि महाबळेश्वर ही दोन्ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची पर्यटनस्थळे असल्याने या मार्गावर स्थानिक नागरिकांच्या वाहनांबरोबरच परजिल्ह्यातून आणि राज्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. रश्मी चौकात मुख्य रस्त्याला अंतर्गत रस्ता जोडला गेल्याने समोरून आणि वळणावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज बांधणे वाहनचालकांसाठी कठीण होते. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांमुळे वळणावरील दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) पूर्णपणे बाधित होते. महाबळेश्वरकडून वेगाने येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने विशेषतः अनोळखी पर्यटकांची वाहने येथे थेट अपघाताच्या तावडीत सापडत आहेत.
काँक्रिटीकरणामुळे रस्ता चांगला झाला असला तरी केवळ गुळगुळीत रस्ता म्हणजे सुरक्षित प्रवास नव्हे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे. धोकादायक वळणांवर आवश्यक असणारे दिशादर्शक फलक, ‘ब्लिंकर’ दिवे, रिफ्लेक्टर (दिशादर्शक पट्टे) आणि गतीरोधक यांचा अभाव असल्याने हा रस्ता अपघातप्रवण क्षेत्र बनत चालला आहे. प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असे नाही; त्यामुळे एखाद्या मोठ्या दुर्घटनेची किंवा जीवितहानीची वाट न पाहता संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या जागेची तात्काळ प्रत्यक्ष पहाणी करावी. वळणावर अडथळा ठरणार्या झाडांच्या फांद्या छाटून त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा फलक उभारावेत, अशी जोरदार मागणी पर्यटन व्यावसायिक व स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.



