Home » पांचगणी » आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचगणीत पोलीस प्रशासनाची ‘मॉक ड्रिल’

आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचगणीत पोलीस प्रशासनाची ‘मॉक ड्रिल’

दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीम संपन्न; शहरातून काढण्यात आला रूट मार्च

​पाचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : आगामी नवरात्रोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याच्या वतीने आज सायंकाळी शहरात जातीय दंगा काबू योजनेअंतर्गत विशेष रंगीत तालीम (मॉक ड्रिल) पार पडली. कोणत्याही आपत्कालीन किंवा तणावपूर्ण परिस्थितीत प्रशासनाची यंत्रणा किती सज्ज आहे, हे तपासण्यासाठी आणि पोलीस दलाच्या अचूक समन्वयाची खात्री करण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते.

​सायंकाळी साडेपाच ते सव्वा सहा या वेळेत पाचगणी एसटी स्थानक परिसरात दंगा नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपायांची प्रत्यक्ष रंगीत तालीम घेण्यात आली. या सरावादरम्यान पोलीस अधिकारी व अंमलदारांना दंगा काबू योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यानंतर पाचगणी शहरात सुरक्षेचा संदेश देण्यासाठी एका विशेष रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

​हा रूट मार्च जुने पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी स्थानक, मुख्य बाजारपेठ, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने पोलीस स्टेशन असा काढण्यात आला. या संपूर्ण मोहिमेमध्ये पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १ पोलीस अधिकारी, ११ पोलीस अंमलदार, १२ होमगार्ड तसेच १ शासकीय वाहन दंगल नियंत्रण व आवश्यक सुरक्षा साहित्यासह पूर्ण तयारीने सहभागी झाले होते. या सरावामुळे पोलीस यंत्रणेची तत्परता दिसून आली असून, नागरिकांमध्ये सुरक्षेचा व विश्वासाचा संदेश गेला आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers