Home » महाबळेश्वर » महाबळेश्वरातील ‘सागा रिसॉर्ट’चे अन्न व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र निलंबित; तपासणीत १६ गंभीर त्रुटी उघड

महाबळेश्वरातील ‘सागा रिसॉर्ट’चे अन्न व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र निलंबित; तपासणीत १६ गंभीर त्रुटी उघड

पांचगणी न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर: पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील मेतगुताड (बोंडारवाडी) येथील ‘सागा रिसॉर्ट’ (Managed by Vyankatesh Group of Hotels) या आस्थापनेच्या अन्न व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्राचे निलंबन करण्याचा धडक आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. ऐन पर्यटन हंगामाच्या तोंडावर थेट रिसॉर्टचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित झाल्याने महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील हॉटेल व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पर्यटकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर प्रशासनाने उगारलेल्या या बडग्याचे सर्वसामान्यांमधून स्वागत होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आस्थापनेबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे गंभीर तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्रि. ना. वाईकर यांनी ३० सप्टेंबर रोजी सागा रिसॉर्टची अचानक प्रत्यक्ष तपासणी केली. या तपासणीत आरोग्य आणि अन्नसुरक्षेचे तीन-तेर सहा वाजल्याचे भीषण वास्तव समोर आले. स्वयंपाकघरातील खिडक्यांना कीटकप्रतिबंधक जाळ्या नसणे, काच तुटलेली असणे, गंजलेल्या कपाटात व अस्ताव्यस्त अवस्थेत कच्चे अन्नपदार्थ साठवणे, तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र चॉपिंग बोर्ड व भांडी न वापरणे अशा अत्यंत निष्काळजी बाबी आढळल्या.

​सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या डब्यांमध्ये व भिंतींच्या खाचखळग्यांमध्ये अन्न साठवले जात होते, तिथे मोठ्या प्रमाणावर झुरळांचा प्रादुर्भाव दिसून आला. तसेच उघड्या कचरापेट्या आणि काळवंडलेल्या भिंतींमुळे परिसराला दुर्गंधीयुक्त स्वरूप आले होते. आस्थापनेत काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांपैकी दोघांचे वैद्यकीय तपासणी अहवाल नव्हते, तर कच्चे अन्न पुरवणाऱ्या पुरवठादारांचा तपशील आणि साफसफाईचे वेळापत्रकही गायब होते. या सर्व १६ गंभीर त्रुटींची नोंद फॉसकॉस (FoSCoS) या ऑनलाईन प्रणालीवर करून अहवाल ओटीपीद्वारे प्रमाणित करण्यात आला.

​सार्वजनिक आरोग्याचा मोठा धोका लक्षात घेता, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ३२(३) नुसार सातारा परिमंडळ-१ चे सहायक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी सं. पां. शिंदे यांनी १ ऑक्टोबर रोजी या रिसॉर्टचे अन्न व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र पुढील आदेशापर्यंत निलंबित केले. निलंबन कालावधीत उत्पादन, साठवणूक किंवा विक्री सुरू ठेवल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, त्रुटींची पूर्तता करून १५ दिवसांत अन्न सुरक्षा आयुक्तांकडे अपील करण्याची मुभा देण्यात आली आहे.

​चौकट: पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही!

​महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात दरवर्षी लाखो पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि निवासासाठी येतात. अशा वेळी नामांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये मिळणारे अन्न सुरक्षित व दर्जेदार असणे अत्यावश्यक आहे. मात्र, नफ्याच्या हव्यासापोटी पर्यटकांच्या जिवाशी खेळणाऱ्या निष्काळजी हॉटेल चालकांवर प्रशासनाने सुरु केलेली ही धडक मोहीम कौतुकास्पद ठरत आहे. आगामी काळात पर्यटनस्थळांवरील सर्वच उपाहारगृहे व रिसॉर्ट्सची अशीच कडक तपासणी व्हावी, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers