Home » पांचगणी » भिलारे हायस्कूलमध्ये दातृत्वाचा नवा आदर्श: विद्यार्थिनींसाठी आधुनिक स्वच्छतागृह आणि टाकाऊतून ४० बेंचेसची भेट

भिलारे हायस्कूलमध्ये दातृत्वाचा नवा आदर्श: विद्यार्थिनींसाठी आधुनिक स्वच्छतागृह आणि टाकाऊतून ४० बेंचेसची भेट

पांचगणी न्यूज

​पांचगणी  : ग्रामीण भागातील शिक्षणाला केवळ पुस्तकी ज्ञानाचीच नव्हे, तर मूलभूत सुविधा आणि आत्मसन्मानाची जोड मिळणे गरजेचे असते. याचाच एक वस्तुपाठ महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी येथील कै. एम. आर. भिलारे हायस्कूलमध्ये पाहायला मिळाला. समाजातील दात्यांच्या सहकार्यातून शाळेत विद्यार्थिनींसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह आणि विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक ४० बेंचेस लोकार्पण करण्यात आल्याने शाळेच्या विकासात एक नवा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

 

​काही काळापूर्वी शाळेतील विद्यार्थिनींसाठी असलेले शौचालय मोडकळीस आल्याने मुलींची मोठी गैरसोय होत होती. ही अडचण ओळखून या जागेवर आता स्वच्छ, आकर्षक टाइल्स लावलेले, हवेशीर आणि सुरक्षित असे नवे स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. यात आधुनिक फिटिंग्ज, बेसिन, आरसे आणि मजबूत दरवाजे बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या स्वच्छतागृहाच्या बाहेरील भिंतींवर विद्यार्थ्यांनीच फुलदाणी, उडणारे पक्षी, समुद्रकिनारा यांसह ‘पृथ्वी वाचवा’ आणि ‘पाणी वाचवा’ यांसारखे पर्यावरण संदेश देणारी सुंदर चित्रे रेखाटली आहेत. या उपक्रमासाठी प्रिझम जॉन्सन टाइल्स कंपनीने टाइल्सची मदत केली, तर अफजल सर आणि राजुशेठ राजपुरे यांच्यासह अनेक दानशूर हातांनी आर्थिक, साहित्याची आणि श्रमाची जोड दिली.

 

​याबाबत बोलताना मुख्याध्यापिका डॉ. तेजस्विनी भिलारे यांनी सांगितले, की “ग्रामीण भागातील मुलगी शाळेत नियमित टिकून राहण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृह असणे ही काळाची गरज आहे. या सुविधेमुळे मुलींची उपस्थिती वाढून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल.”

 

याच सोहळ्यात शाळेला ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेवर आधारित ४० नवीन बेंचेसची भेट मिळाली. उद्योजक चंद्रशेखर मुंडले यांनी या बेंचेस शाळेला प्रदान केल्या आहेत. अद्विका हेडचे राजीव भट्टाचार्य यांनी विशेष कौशल्याने तयार केलेल्या या बेंचेस अत्यंत मजबूत, टिकाऊ आणि पाण्यानेही खराब न होणाऱ्या आहेत. या नवीन बैठकीमुळे वर्गांमधील वातावरण अधिक शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक झाले आहे.

 

​हे दोन्ही उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्ल सर आणि शमा मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच जितेंद्र शिर्के, अजित राजपुरे, संजय लोहार, विद्या ननावरे आणि राकेश नेवसे यांनी मोलाचे श्रम घेतले.

​”समाजातील दात्यांनी ग्रामीण भागातील शाळांच्या सक्षमीकरणासाठी पुढे येणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. अशा मदतीमुळे आम्हाला शिक्षणाचा दर्जा आणि सुविधा अधिक उंचावण्यासाठी नवी ऊर्जा मिळते,” अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष नितीन दादा भिलारे आणि सचिव जतिन सर यांनी व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल सर्व दात्यांचे शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers