Home » पांचगणी » पाचगणीत १८ ऑक्टोबरला ‘काव्यगंध’ संमेलन; कवी नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती, मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पाचगणीत १८ ऑक्टोबरला ‘काव्यगंध’ संमेलन; कवी नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती, मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पांचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी :साहित्य, काव्य आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर आइन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘काव्यगंध’ (पर्व सहावे) या बहुप्रतिक्षित राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचा रंगतदार सोहळा येत्या रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) आयोजित करण्यात आला आहे. भोसे-भिलार रस्त्यावरील हॉटेल आयव्ही पार्क येथे सकाळी १० वाजता या साहित्यिक मेळाव्याचा शुभारंभ होणार असून, या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

​पर्यटन आणि साहित्याचा सुंदर मिलाफ लाभलेल्या पांचगणी आणि पुस्तकांचे गाव म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या भिलारच्या निसर्गरम्य परिसरात रंगणाऱ्या या काव्यसंमेलनाला महाराष्ट्रातील प्रख्यात कवी व ‘दंगलाकार’ नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या खास शैलीतील काव्यरचना आणि वक्तृत्वाने हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि शैक्षणिक सल्लागार लक्ष्मीकांत रांजणे हे विराजमान असणार आहेत.

​गेल्या पाच पर्वांची यशस्वी परंपरा जपणाऱ्या ‘काव्यगंध’ संमेलनाचे हे सहावे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण महाराष्ट्रातून विविध विचारांचे, भावनांचे आणि विविध शैलींचे प्रतिनिधित्व करणारे नामवंत कवी या व्यासपीठावर आपल्या रचना सादर करणार आहेत. निसर्गाच्या कुशीत रंगणाऱ्या या काव्यात्मक संवादातून रसिकांना अनोखा शब्दआनंद अनुभवता येणार आहे.

​या गझल, कविता आणि साहित्याचा आविष्कार असणाऱ्या भव्य संमेलनाला परिसरातील सर्व साहित्यिक, रसिक आणि काव्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आग्रही आवाहन सर आइन्स्टाईन अकॅडमी व ज्ञानगंगा हायस्कूलच्या आयोजकांनी केले आहे.

​ भिलारच्या साहित्यनगरीत रंगणार काव्याचा जागर

​पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार-पांचगणी परिसराने नेहमीच साहित्यिक उपक्रमांना कौतुकाची थाप दिली आहे. ‘काव्यगंध’च्या सहाव्या पर्वाच्या निमित्ताने राज्यातील नामवंत कवी एकत्र येत असल्याने यंदाचा हा सोहळा स्थानिक साहित्य वर्तुळात विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers