पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पर्यावरण संवर्धनासोबतच कारागृहातील कैद्यांच्या पुनर्वसनाला आणि त्यांच्यातील सकारात्मकतेला चालना देणारा एक अनोखा व वेगळा उपक्रम इनर व्हील क्लब ऑफ पांचगणीच्या वतीने राबविण्यात आला. पुण्यातील ऐतिहासिक येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात निसर्ग जोपासना आणि फलोत्पादन कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी क्लबतर्फे तब्बल ६०० स्ट्रॉबेरीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या विशेष परवानगीने आणि मार्गदर्शनाखाली हा हरित उपक्रम पार पडला. कारागृहाच्या आवारात केवळ बंदिस्त वातावरण न राहता एक सुंदर हिरवागार पट्टा निर्माण व्हावा आणि कैद्यांना प्रत्यक्ष शेतीचे व फलोत्पादनाचे धडे मिळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. पांचगणीची जगप्रसिद्ध ओळख असलेली स्ट्रॉबेरी आता येरवडा कारागृहाच्या मातीतही बहरणार असून, या रोपांची संपूर्ण निगा आणि जोपासना कैद्यांकडूनच केली जाणार आहे. या माध्यमातून कैद्यांमध्ये शाश्वत जीवनशैलीची सवय रुजण्यास मदत होणार आहे.
हा उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस टीमने अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवत सहकार्य केले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या आपुलकीच्या आदरातिथ्यामुळे इनर व्हील क्लबच्या पदाधिकारी व सदस्या भारावून गेल्या. कारागृहातील बंदिस्त आयुष्यात निसर्गाचा स्पर्श आणि कृषी कौशल्याची जोड मिळाल्यास कैद्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडून येतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमावेळी इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा श्वेता बोधे, सचिव स्नेहा होळकर, माजी अध्यक्षा संगीता पाटील, सीमा संमेळ यांच्यासह कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. इनर व्हील क्लबच्या या कल्पक आणि सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
‘माती तीच, पण स्पर्श निसर्गाचा!’
बंदिस्त आयुष्यात रुजणार हिरवा कोपराएरवी येरवडा कारागृह हे कडक सुरक्षेसाठी ओळखले जाते. मात्र, पांचगणीच्या इनर व्हील क्लबने घेतलेल्या पुढाकारामुळे आता कारागृहाच्या आवारात स्ट्रॉबेरीची लालचुटूक फळे बहरणार आहेत. कैद्यांच्या हातांनी रोपांची होणारी जोपासना केवळ फलोत्पादनापुरती मर्यादित न राहता, त्यांच्या मानसिकतेत सकारात्मकता निर्माण करणारी ठरेल. बंदिस्त भिंतींच्या आत निसर्गाचा हा हरित स्पर्श कैद्यांच्या पुनर्वसनासाठी एक नवी दिशा देणारा ठरणार आहे.



