पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : या जगात आई वडिलांच्या पेक्षा जास्त प्रेम आपल्या मुला – मुलीवर कुणी करू शकत नाही, त्यामुळे जीव गेला तर बेहत्तर पण आपल्या बापाला मान खाली घालावी लागेल असे वागू नका, असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले. स्वर्गात गेलेल्या आई वडिलांना कोणताही देव परत आणू शकत नसल्याने जो पर्यंत आपल्या आई वडिलांचा श्वास चालू आहे तो पर्यंत त्यांच्या श्वासावर प्रेम करा, असेही ते म्हणाले.
पाचगणी (ता. महाबळेश्वर )येथील पोलीस ठाण्याच्या वतीने भाऊसाहेब भिलारे क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या ‘आई-बाप समजून घेताना’ या विशेष समाजप्रबोधनपर व्याख्यानात ते बोलत होते.
या प्रसंगी पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नगरसेवक प्रकाश गोळे, महेश खांडके, सुप्रिया माने, नगरसेविका लक्ष्मीताई कराडकर, नानासाहेब कासुर्डे, रोटरीचे अध्यक्ष आदित्य गोळे, वैशाली भिलारे, तेजस्विनी भिलारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर,रोटरी व इनरव्हील क्लबचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर पांचगणीतील सुमारे 30 शाळांमचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.
हंकारे पुढे म्हणाले, शत्रूंच्या महिलांना सुद्धा सन्मानाची वागणूक देणारे छत्रपती शिवराय हे आपले आदर्श आहेत. ज्यांच्या घरातील आई बाप जास्त आनंदी ते कुटुंब श्रीमंत कुटुंब आहे. आई वडिलांचे कष्ट विसरू नका. तुमच्या दोन्हीही गालाचा पहिला मुका आई घेते, तर डोळ्यातील आनंदाश्रूंचा पहिला थेंब तुमच्या तोंडावर टाकणारा बाप पहिला असतो. छत्रपती संभाजीराजेंचे ३९ दिवस हाल केले. मात्र मला माझे स्वराज्य व वडील प्रिय आहेत हे उत्तर देत संभाजीराजांनी प्राणाचे बलिदान दिले. ज्यांच्या बद्दल आपल्याला काहीच माहिती नाही अशांच्या प्रेमात पडू नका व व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आपला बाप झोपला असताना त्याच्या बनियनला किती भोके आहे हे पहा. प्रसूती वेदना सहन करताना आई माझा जीव गेला तरी चालेल मात्र पोटातील गोळ्याला वाचवा, अशी विनंती डॉक्टरला करते. त्या वेदना समजून घ्या. भरल्या ताटावरून उठून तुमच्या गरजा भागवणाऱ्या बापाच्या घामाची किंमत जाणून घ्या. अनाथ आश्रमात जाऊन ज्यांना आई बाप नाहीत त्यांचे दुःख समजून घ्या, असे ते म्हणाले.
आपल्या ओघवत्या, वास्तववादी आणि अंतर्मुख करणाऱ्या शैलीत बोलताना वसंत हंकारे यांनी आई-वडिलांच्या त्यागाचा आणि कौटुंबिक नात्यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. विद्यार्थिदशा हाच आयुष्याचा पाया असल्याने या वयात लागणाऱ्या सवयी भविष्याची दिशा ठरवतात. त्यामुळे सोशल मीडियाचा अतिवापर, वाईट संगत अन् व्यसनांच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमांची कास धरावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. हंकारे यांच्या भावनिक आव्हानाने भिलारे स्टेडियमवरील वातावरण पुरते भारावून गेले असून, अनेक विद्यार्थी व पालकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
प्रास्ताविक दिलीप पवार यांनी सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी, तर आभार बालाजी सोनुने यांनी मानले.
वाईचे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे व पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या संकल्पनेतून अन् मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता, गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेला मुळापासून उखडण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या या प्रबोधनात्मक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाने शाळेच्या असख्य मुली अक्षराशा ढसाढसा रडल्या.
- अनेक महिला, मुलींना अश्रू अनावर तसेच सोशल मीडिया मधील ओळखीला बळी पडून ऐन तरुणी अनेक ‘चुका ‘करून बसतात व त्याचे प्रायश्चित सर्वात जास्त समाज्यात व इतर ठिकाणी बाप नावाच्या व्यक्तीला द्यावे लागते, क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता बुद्धीने व आर्थिकरित्या स्वावलंबी बना यासंदर्भातील विविध क्षेत्रातील उदाहरणे देत, बाप म्हणजे काय हे हंकारे यांनी संवेदनशीलरित्या सांगितले. या व्याख्यानासाठी आलेल्या अनेक महिला, मुलींना अश्रू अनावर झाले.



