पांचगणी न्यूज नेटवर्क
रांजणी : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला पाठबळ मिळावे या उदात्त हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, रांजणी येथे सोमवारी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. नितीन गणपत वन्ने व समाजसेविका सौ. आशाताई नितीन वन्ने या दानशूर दाम्पत्याच्या सौजन्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हातात नवीन वह्या आणि साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि दानशूर वन्ने दाम्पत्याचे पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुलांमध्ये अथांग गुणवत्ता दडलेली असते; फक्त त्यांना योग्य वेळी योग्य प्रोत्साहनाची गरज असते. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, जिद्द आणि कठोर शिस्तीच्या जोरावर आपले शैक्षणिक यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच रांजणी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभी राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी वन्ने दाम्पत्याने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी अत्यंत स्तुत्य असून, अशा उपक्रमांमुळे समाज आणि शाळा यांच्यातील नाते अधिक दृढ होते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या सामाजिक सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक व सर्व विद्यार्थ्यांनी वन्ने दाम्पत्याचे मनापासून आभार मानले.
या सोहळ्यास रांजणीच्या सरपंच सौ. मंदा रांजणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. जयश्री शैलेश रांजणे, उपाध्यक्ष श्री. किरण जंगम, शिक्षण तज्ज्ञ श्री. संतोष रांजणे, ग्रामस्थ श्री. विजय जाधव, सौ. सुशीला रांजणे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. अभिजित ननावरे, श्री. संजय वन्ने, श्री. पिंकेश सपकाळ, श्री. राहुल वन्ने, सौ. जयमाला सं. वन्ने, श्रीम. यादव मॅडम, श्री. पठाण सर, श्री. कसबे सर, सागर मोरे यांच्यासह गावातील नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आयोजन मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंदाने केले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.



