Home » सातारा » मायणी-धोंडेवाडी शिवारात गोवंशाची अवैध कत्तल उघडकीस; ९ लाख ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मायणी-धोंडेवाडी शिवारात गोवंशाची अवैध कत्तल उघडकीस; ९ लाख ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पांचगणी न्यूज नेटवर्क

खटाव (प्रतिनिधी) : मायणी-धोंडेवाडी गावच्या शिवेवरील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश सदृश जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल केली जात असल्याचा संशयास्पद आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत पोलिसांनी जिवंत जनावरे, मृत वासरे, गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन असा तब्बल ९ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण खटाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास संजय गणपत साठे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना घडल्याचे समोर आले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता, घटनास्थळी अत्यंत निर्दयपणे आणि दाटीवाटीने वाहनात कोंबलेल्या दोन देशी खिलार गायी, दोन अन्य गायी, एक गीर जातीचा खोंड, तीन जर्सी गायी तसेच मृत अवस्थेतील वासरे आढळून आली. याशिवाय तेथे उभ्या असलेल्या टाटा दोस्त वाहनात मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

​या प्रकरणी पोलीस अंमलदार संदीप खाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाचे आदेश दिले. हवालदार कदम यांनी गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून, या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सदगर करत आहेत.

​विजयादशमीच्या या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तल आणि अवैध वाहतुकीचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी आढळलेल्या जनावरांची स्थिती, गोमांसाची कुठे विक्री केली जाणार होती? आणि या रॅकेटमागे नक्की कोणाचा हात आहे? याचा शोध घेणे हे सध्या पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा व दोषींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भागातील नागरिकांमधून जोर धरत आहे.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers