पांचगणी न्यूज नेटवर्क
प्रतापगड : सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाचे सावट दूर होऊन दमदार व समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी वर्ग तसेच सर्वसामान्यांना दुष्काळाच्या संकटातून मोठा दिलासा मिळावा, या अत्यंत लोकहिताच्या आणि महत्त्वाच्या उद्देशाने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी किल्ले प्रतापगडावरील ऐतिहासिक श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी साकडे घातले आहे. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पार्श्वभूमीवर आणि महाअष्टमीच्या मंगलमुर्हुतावर सोमवारी त्यांनी आपली धर्मपत्नी सौ. दमयंतीराजे भोसले यांच्यासह सपत्नीक प्रतापगडावर उपस्थित राहत देवीचे विधीवत पूजन व दर्शन घेतले.
या वेळी बोलताना आणि प्रार्थना करताना, पावसाअभावी निर्माण होणारी शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई दूर व्हावी, राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढून सर्वत्र हिरवळ फुलावी आणि कबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाच्या जीवनात आनंद व सुख-समृद्धी नांदावी, अशी आर्त हाक देवीच्या दरबारात घालण्यात आली. ऐतिहासिक शिवकालीन पार्श्वभूमी असलेल्या आणि स्वराज्याच्या साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगडावरील या देवीच्या दरबारात नवरात्रोत्सवाच्या काळात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, महाअष्टमीच्या या विशेष पूजनाने संपूर्ण गड परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीत येऊन खासदार उदयनराजे यांनी राज्यातील दुष्काळी स्थितीचे सावट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी साकडे घातल्याने सर्वसामान्यांमधून आणि शेतकरी वर्गातून कृतज्ञता व्यक्त होत आहे. देवीच्या दर्शनानंतर त्यांनी गडावरील उपस्थितांशी संवाद साधत सर्व नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच जनतेच्या संकटांचे निवारण होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली.



