Home » कराड » अनैतिक संबंधातून तरूणाचा खून : मलकापूर येथील घटना : दोघांना अटक

अनैतिक संबंधातून तरूणाचा खून : मलकापूर येथील घटना : दोघांना अटक

पांचगणी न्यूज नेटवर्क

कराड : आई बरोबर असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून मित्राच्या मदतीने आईच्या प्रियकराच्या डोक्यात व शरीरावर कोयत्याने वार करून त्याची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. खून करून संशयित आरोपीनी पलायन केले होते. मात्र, डीबी पथकाने सातारा येथून संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन कोयते व एक चार चाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही संशयितांना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुनिल नाथा चव्हाण (वय 37, रा. चाफळ, ता. पाटण) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर सूरज दिपक चव्हाण (वय 23, रा. चाफळ, ता. पाटण) व त्याचा मित्र अक्षय सुरेश म्हेत्रे (वय 23, रा. कोरेगाव, ता. सातारा) अशी पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित सूरज चव्हाण याच्या आईबरोबर मयत सुनिल चव्हाण याचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबध होते. आपल्या आईबरोबर सुनिल याचे संबंध असल्याचे मुलाला खटकत होते. त्याचाच राग मनात धरून मुलगा सूरज चव्हाण याने मित्राच्या साथीने सुनिल याचा काटा काढायचा प्लॅन तयार केला. मयत सुनिल चव्हाण हा कराडात पिझ्झा डिलेव्हरीचे काम करत होता हे संशयितांना माहित होते. सूरज आणि त्याचा मित्र अक्षय हे रविवारी रात्री नऊ वाजता कराड येथे येऊन सुनिल जॉबवरून सुटण्याची वाट बघत होते. रात्री एकच्या सुमारास सुनिल जॉबवरून सुटला. संशयित सूरज व त्याचा मित्र अक्षय याने त्याला लाहोटीनगर येथील सर्व्हिस रस्त्यावर थांबवून त्याच्या डोक्यात व शरीरावर कोयत्याने वार करून निघृण खून केला. घटनेनंतर संशयित सूरज चव्हाण व अक्षय म्हेत्रे यांनी स्वतःच्या चारचाकी गाडीतून सातारकडे पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयितांचा माग काढला. पोलिसांनी दोघांना सातारा येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन कोयते व चारचाकी गाडी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers