Home » मेढा » अभिनेत्रीवरील अत्याचारप्रकरणी फरार बॉलिवूड दिग्दर्शक शकील नुरानी रेंगडीतून ताब्यात; मुंबई पोलिसांच्या सुपूर्द

अभिनेत्रीवरील अत्याचारप्रकरणी फरार बॉलिवूड दिग्दर्शक शकील नुरानी रेंगडीतून ताब्यात; मुंबई पोलिसांच्या सुपूर्द

पांचगणी न्यूज नेटवर्क 

​मेढा : अभिनेत्रीवरील अत्याचार आणि लैंगिक छळप्रकरणी मुंबईतून फरार झालेल्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माता शकील नुरानी याला मेढा पोलिसांनी जावली तालुक्यातील रेंगडी येथून शिताफीने ताब्यात घेतले. मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नुरानी रेंगडी येथील आपल्या फार्महाऊसवर लपून बसला होता. मेढा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या हवाली केले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय अभिनेत्रीने नुरानीविरोधात मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात अत्याचार व लैंगिक छळाची गंभीर तक्रार दाखल केली आहे. आगामी चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने घरी बोलावून नशेचे पदार्थ देणे आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून धमकावल्याचा गंभीर आरोप नुरानीवर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे चित्रपट वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून मालवणी पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो सातत्याने चकवा देत होता.

​दरम्यान, शकील नुरानी हा सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील रेंगडी या मूळ गावी फार्महाऊसमध्ये लपून बसल्याची पक्की माहिती मालवणी पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांनी तातडीने मेढा पोलिसांशी संपर्क साधून या संदर्भात माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे मेढा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी धीरजकुमार बेचके व शिवाजी डफळे यांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास नुरानीच्या शेतघरावर अचानक छापा टाकला.​या कारवाईत पोलिसांनी शकील नुरानी याला जागीच ताब्यात घेतले. यानंतर मुंबई पोलिसांचे विशेष पथक मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, मेढा पोलिसांनी नुरानीला अधिकृतपणे त्यांच्या स्वाधीन केले आहे. आता त्याला मुंबईत नेऊन अटकेची पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers