पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड ः वारूंजी फाटा, हजारमाची, तासवडे, खंडाळा तालुक्यातील म्हावशीसह फलटण, वाई, महाबळेश्वर, सातारा व कराड येथे सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू, ताडी व इतर अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग कराड, जिल्हा पोलीस दल व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी संयुक्त कारवाई करत चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे पावणे चार लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अनिल लक्ष्मण कदम, राहुल सोपान पडळकर, राजू मारूती पवार, पंकज मुकेश पाटील अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू, ताडी व इतर अवैध मद्यावर कारवाई करण्यासाठी दोन दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क कराड, भरारी पथक सातारा, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा कार्यालयाने शनिवारी वारूंजी फाटा, हजारमाची, तासवडे व खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथे सुरू असलेल्या अवैध ताडी व देशी/विदेशी दारू विक्री केंद्रावर छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 90 लिटर ताडी, देशी विदेशी दारू असा एकूण 1 लाख 13 हजार 550 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस विभागाच्या मदतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने फलटण, कराड, वाई-महाबळेश्वर व सातारा येथे 14 ठिकाणी छापा टाकून त्यामध्ये 57 लिटर देशी दारू, 24 लिटर विदेशी दारू, 140 लिटर ताडी तसेच हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणारे 2 हजार 925 लिटर रसायन असा एकूण 2 लाख 59 हजार 330 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, राज्य उत्पादन शुल्क सातारा भरारी पथकाचे निरीक्षक माधव चव्हाण, कराडचे निरीक्षक बापूसाहेब डोणे, उपनिरीक्षक अजयकुमार पाटील, श्रीमती उमा पाटील, संतोष पाटील, नितीन जाधव, अजित रसाळ, राणी लोहार, अरूण जाधव, ज्ञानेश्वर मोरे, सागर चव्हाण, महेश टीळेकर, बाळासो पाचुंदे, लक्ष्मण जगधने, अरूण पाटील, शिवाजी भिसे, प्रविण कांबळे, पृथ्वीराज जाधव यांनी केली.
अवैध मार्गाने तयार केलेली हातभट्टी दारू, ताडी किंवा अवैध मद्य पिल्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होत असल्याने काही ठिकाणी दुदैर्वी घटना घडल्या आहेत. अशा प्रकारची अवैध हातभट्टी दारू, बनावट ताडी व बनावट मद्य नागरिकांनी प्राशन करू नये. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभाग साताराचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे.



