Home » पांचगणी » एकाच नंबरवर दोन राज्यात दोन वाहने प्रकरणी बेळगाव आरटीओवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा : अनिल बोधे यांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

एकाच नंबरवर दोन राज्यात दोन वाहने प्रकरणी बेळगाव आरटीओवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा : अनिल बोधे यांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : डिजिटलायझेशनच्या युगात सरकारी विभागांच्या कारभारातील घोळ अनेकदा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरतात, याचाच एक धक्कादायक प्रत्यय महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथे आला आहे. पाचगणी येथील रहिवासी व व्यावसायिक अनिल गजानन बोधे यांच्या मालकीच्या ‘बुलेट’ मोटरसायकलचा नंबर चक्क शेजारील कर्नाटक राज्यातील बेळगाव आरटीओने एका ‘जीप’ गाडीला दिल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून या यंत्रणेच्या घोळाशी लढा देणाऱ्या बोधे यांनी अखेर याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर चौकशीसाठी पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.

अनिल गजानन बोधे यांच्या मालकीची ‘बुलेट’ (क्र. BLM 5683) ही गाडी सातारा आरटीओ कार्यालयाकडे दि. १२ जानेवारी २००७ पासून रीतसर नोंदणीकृत आहे. या वाहनाचे सन २०२० पर्यंतचे पासिंगही पूर्ण झालेले आहे. सर्व कागदपत्रे वैध असताना, काही दिवसांपूर्वी बोधे यांनी आपली बुलेट ऑनलाइन प्रणालीवर (परिवहन सेवा) अपडेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी समोर आलेली माहिती पाहून त्यांना मोठा धक्का बसला. सातारा आरटीओच्या रेकॉर्डवर असलेली ही बुलेट कर्नाटक राज्यातील बेळगाव आरटीओने महेश शेट्टी नामक व्यक्तीच्या नावावर ऑनलाइन नोंदवली असल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे, बुलेटचा हा नंबर कर्नाटकात एका ‘महिंद्रा’ कंपनीच्या फोर-व्हीलर (जीप) गाडीला वापरला जात असल्याचे उघड झाले.

या गंभीर प्रकारानंतर अनिल बोधे यांनी स्वतः बेळगाव आरटीओ कार्यालयात जाऊन चौकशी केली. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी कोणतीही लेखी माहिती देण्यास नकार देत, ‘आमच्याकडे या वाहनाची काहीही माहिती उपलब्ध नाही’ असे तोंडी सांगून हात झटकले. जर आरटीओकडे मूळ कागदपत्रे किंवा माहिती नाही, तर मग कोणत्या आधारावर महाराष्ट्रातील एका दुचाकीचा नंबर कर्नाटकातील चारचाकीला ऑनलाइन देण्यात आला? असा संतप्त सवाल बोधे यांनी उपस्थित केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते या तांत्रिक आणि प्रशासकीय घोळाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

हा केवळ एक तांत्रिक घोळ नसून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मूळ पासिंग महाराष्ट्र राज्यातील आणि सातारा आरटीओचे असताना, बेळगावात त्याची परस्पर नोंद कशी झाली? भविष्यात जर त्या संबंधित चारचाकी वाहनाकडून कर्नाटकात एखादा गंभीर गुन्हा किंवा अपघात घडल्यास, त्याचा नाहक त्रास पाचगणीतील निष्पाप वाहनधारकाला सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील जुन्या क्रमांकांच्या वाहनांचा असा गैरवापर परराज्यात होतो आहे का? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

आपल्या हक्काच्या वाहनाचे ऑनलाइन प्रोसेसिंग व्हावे आणि बेळगाव आरटीओच्या या बेजबाबदार कारभारावर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी अनिल बोधे यांनी पाचगणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने यांची भेट घेऊन त्यांना पुराव्यांसह सविस्तर निवेदन दिले. या निवेदनासोबत त्यांनी सातारा आरटीओची कागदपत्रे, मूळ मोटरसायकलच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स आणि कर्नाटकातील त्या संबंधित फोर-व्हीलर जीपची ऑनलाइन माहिती आदी भक्कम पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत.

​आता या आंतरराज्यीय आरटीओ घोळाचा तपास पाचगणी पोलीस कसा करणार आणि मूळ वाहनधारकाला कधी न्याय मिळणार, याकडे पाचगणी व सातारा जिल्ह्यातील वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers