पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड : कराड शहरातील एका व्यावसायिक आस्थापनावर नुकताच छापा टाकण्यात आला. यावेळी पिडिलाइट कंपनीच्या नावाने विक्रीसाठी ठेवण्यात आलेला बनावट ‘फेविक्वीक’चा सुमारे ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमालाच साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिडिलाइट कंपनीच्या उत्पादनांच्या बौद्धिक संपदा आणि कॉपीराइट संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या तपास यंत्रणेला कराड परिसरात कंपनीच्या नावाने बनावट उत्पादने विकली जात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने कराड- मलकापूर मार्गावरील एका व्यावसायिक आस्थापनावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान, आठ बॉक्स आढळून आले. कारवाईदरम्यान दुकानातील विविध उत्पादनांची तपासणी करण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उत्पादनावरील छपाई, रंगसंगती, पॅकेजिंग आणि अन्य तांत्रिक बाबींची बारकाईने पडताळणी केली. तपासात संबंधित माल मूळ ‘फेविक्वीक’ उत्पादनाशी जुळत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हा माल बनावट असल्याचे स्पष्ट झाले. कराड शहर पोलिसांनी पंचासमक्षक पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपासकार्ड शहर पोलिसांकडून सुरू असून बनावट उत्पादनांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे.



