पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड : – शहरातील रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागील परिसरात छापा टाकून पोलीस उपाधीक्षक कार्यालयाच्या पथकाने ९६ हजार १०० रुपये किमतीचा १ किलो ९२२ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजाचा पुरवठा आणि वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार हर्षल साळुखे यांनी सरकारतर्फे कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अशोक नंदाप्पा बिराजदार (रा. रेठरेकर कॉलनी, मुजावर कॉलनी रोड, कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक प्रभावी करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कराडच्या पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील या जिल्ह्याच्या अँटी नार्कोटिक्स अवेअरनेस कॅम्पेनच्या नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) पोलीस उपाधीक्षक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराडमधील रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे राहत्या घराजवळ अशोक बिराजदार हा गांजा विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजश्री पाटील यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्या अधिपत्याखालील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत १.९२२ किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाचा स्रोत, त्याचा पुरवठा करणारे, तसेच वाहतुकीत सहभागी असलेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस हवालदार असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, हर्षल साळुखे आणि मयुर देशमुख यांनी केली.



