पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड : कराड शहरात सोमवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. शहरातील सर्वाधिक गर्दीची ठिकाणे असलेल्या मुख्य भाजी मंडई, कृष्णा पूल आणि कृष्णा घाट परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः उच्छाद मांडत तब्बल नऊ जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कराड शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्व जखमींवर येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात (कॉटेज हॉस्पिटल) तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
रस्त्यात दिसेल त्याला घेतला चावा; असा सुरू झाला थरार
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा थरार सुरू झाला. अधिकराव पाटील हे आपल्या दुचाकीवरून कराडमधून रिसवडच्या दिशेने निघाले होते. ते कृष्णा पुलावर आले असता, अचानक या पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करून चावा घेतला. त्यानंतर या कुत्र्याने पुलावरच आरबाज मुल्ला या तरुणाला जखमी केले. एवढ्यावरच न थांबता हे पिसाळलेले कुत्रे पुलावरून थेट मुख्य शहरात शिरले. गजबजलेल्या भाजी मंडईत धुमाकूळ घालत काहींना चावा घेतल्यानंतर ते कृष्णा घाटाच्या दिशेने धावले. रस्त्यात जो कोणी समोर येईल, त्याच्यावर हे कुत्रे थेट हल्ला चढवत होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रस्त्यावरील नागरिकांची एकच पळापळ झाली.
सहा जण गंभीर जखमी; तिघांना डिस्चार्ज
या पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. यामध्ये आरबाज हैदरअली मुल्ला (वय २५, रा. कार्वे नाका), अधिकराव उत्तम पाटील (वय ४९, रा. रिसवड), इम्रान बशिर बेपारी (वय ३०, रा. गुरुवार पेठ), राहुल मारुती जाधव (वय ४२, रा. दुशेरे), कौस्तुभ अशोक झिमरे (वय ३१, रा. वाखाण रोड) आणि भाविका कौस्तुभ झिमरे (वय ३२, रा. वाखाण रोड) या सहा जणांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर विनायक बाळासो गायकवाड (वय ५१, रा. शुक्रवार पेठ), सचिन राजाराम विभुते (वय ५०, रा. गुरुवार पेठ) व तुकाराम सुभाषराव मिसाळ (वय ४०, रा. विद्यानगर) यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
माजी उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांच्याकडून जखमींची विचारपूस
घटनेची माहिती मिळताच कराड पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांनी तातडीने कॉटेज हॉस्पिटलला भेट देऊन सर्व जखमींची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त केला आहे. तसेच, या कुत्र्याने शहरातील इतर भटक्या कुत्र्यांना चावा घेतला आहे का, याचा शोध पालिका कर्मचारी घेत असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
…तर तातडीने कॉटेज हॉस्पिटलशी संपर्क साधा: डॉ. सुनिला लाळे
या घटनेबाबत उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिला लाळे यांनी सांगितले की, “पिसाळलेल्या कुत्र्याने शहरातील गर्दीच्या ठिकाणी हल्ला केल्यामुळे नेमके किती लोकांना चावा घेतला, याची अचूक संख्या समोर आलेली नाही. रुग्णालयात आलेल्या नऊ जणांवर आम्ही तातडीने उपचार सुरू केले आहेत. शहरात किंवा संबंधित परिसरात जर आणखी कोणाला या कुत्र्याने चावा घेतला असेल किंवा ओरखडले असेल, तर त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कॉटेज हॉस्पिटलशी संपर्क साधून अँटी-रेबीज (रेबीज प्रतिबंधक) लस टोचून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.



