Home » जावळी » कर्तव्यनिष्ठ जवान तुषार भिलारे अनंतता विलीन; शासकीय इतमामात पवारवाडीत अखेरचा निरोप

कर्तव्यनिष्ठ जवान तुषार भिलारे अनंतता विलीन; शासकीय इतमामात पवारवाडीत अखेरचा निरोप

वीर जवान तुषार भिलारे अमर रहे’च्या घोषणांनी जावळीचा आसमंत दुमदुमला; चिमुकल्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले

​आनेवाडी,  : देशसेवेचे पवित्र स्वप्न उराशी बाळगून सीमारेषेवर अहोरात्र कर्तव्य बजावणारे पवारवाडी (ता. जावळी) येथील सुपुत्र जवान तुषार राजेंद्र भिलारे (वय ३४) यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. सुट्टीवर गावी आले असताना झाडावरून पडून झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये अथक उपचार सुरू होते, मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. बुधवारी लष्करी आणि शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘अमर रहे… अमर रहे… जवान तुषार भिलारे अमर रहे!’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांनी संपूर्ण जावळी तालुका शोकमग्न झाला.

​जवान तुषार भिलारे हे मध्यप्रदेशातील महू येथे भारतीय सैन्यात सेवा बजावत होते. सुट्टीसाठी आपल्या मातृभूमीत आलेल्या या वीरपुत्राच्या अकाली निधनाची बातमी धडकतात संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली. बुधवारी त्यांचे पार्थिव गावात दाखल होताच, आनेवाडीपासून ते पवारवाडीपर्यंत फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या मार्गावरील प्रत्येक गावागावांत नागरिकांनी, अबालवृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून अश्रुपूर्ण डोळ्यांनी पुष्पवृष्टी करत आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा सलाम केला.

​पवारवाडी येथे पार्थिव पोहोचताच अंतिम दर्शनासाठी जनसागर उसळला होता. भारतीय सैन्य दल, सातारा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यानंतर लष्करी परंपरेनुसार आणि शासकीय इतमामात हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून या वीर जवानाला मानवंदना देण्यात आली. तो क्षण उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडवणारा ठरला.

​अंत्यसंस्कारावेळी अत्यंत हृदय हेलावून टाकणारा क्षण तेव्हा आला, जेव्हा तुषार यांच्या पार्थिवाजवळ त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींनी एकच आक्रोश केला. आपल्या घरातील हसताखेळता आधारवड आणि देशाचे रक्षण करणारा सुपुत्र कायमचा निघून गेल्याच्या वेदनेने कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा ऐकून उपस्थितांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. स्मशानभूमीत उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांचे डोळे पाणावले होते.

​या अंत्यसंस्कार सोहळ्याप्रसंगी आर्मीचे वरिष्ठ अधिकारी व जवान, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे प्रतिनिधी, सातारा पोलीस दलाचे जवान, तहसीलदार प्रवीण मुदगल, जिल्हा परिषद सदस्या जयश्री गिरी, पंचायत समिती सदस्या चारूशीला पवार, मेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, जयहिंद फाउंडेशनचे सचिव उमेश मोरे यांच्यासह महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, विविध राजकीय, सामाजिक व लष्करी क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक आणि परिसरातील हजारो नागरिक या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

​दरम्यान, दिवंगत जवान तुषार भिलारे यांचा सावडणे विधी गुरुवार, दि. २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पवारवाडी (ता. जावळी) येथील स्मशानभूमीत पार पडणार असल्याचे कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers