वनविभाग गांधारीच्या भूमिकेत; दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? पालकांचा संतप्त सवाल
कुडाळ (पांचगणी न्यूज नेटवर्क ): जावली तालुक्यातील कुडाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीच्या परिसरामध्ये असलेली मोठमोठी जुनी झाडे सध्या येथील लहानग्या विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनू लागली आहेत. पावसाळा सुरू झाल्याने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या झाडांच्या अवाढव्य फांद्या कधी शाळेच्या छतावर तर कधी थेट मैदानावर कोसळत आहेत. अशा अत्यंत भीतीदायक वातावरणात चिमुकल्यांना आपला जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत असल्याने, पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे याठिकाणी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली असून ‘वनविभाग गांधारीच्या भूमिकेत’ असल्याचा आरोप आता ग्रामस्थ करू लागले आहेत.
या परिसरात लहान मुले, पालक आणि शिक्षकांची दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अनेकदा शिक्षक आणि नागरिक आपली वाहनेही याच झाडांखाली उभी करतात. सध्या पावसाचा जोर हळूहळू वाढत असून, वाऱ्यामुळे एखादी मोठी फांदी किंवा संपूर्ण झाडच कोसळून मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली आहे. जर चुकून एखादी फांदी विद्यार्थ्यांच्या अंगावर पडली आणि काही जीवितहानी झाली, तर त्याला जबाबदार कोण? असा जळजळीत सवाल उपस्थित करत पालकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.
या गंभीर समस्येबाबत वनविभागाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या ढिम्म कारभारामुळे कुडाळमधील पालक आणि ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने तत्परतेने या धोकादायक झाडांची आणि फांद्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सर्वच शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न; वनविभागाने पाहणी करावी!
“फक्त कुडाळच नव्हे, तर जावली तालुक्यातील अनेक गावांमधील शाळांच्या आवारात अशीच मोठमोठी आणि जुनी झालेली झाडे उभी आहेत. पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही झाडे उन्मळून पडण्याचा किंवा त्यांच्या फांद्या तुटण्याचा धोका दुपटीने वाढतो. आपल्या चिमुकल्यांच्या अंगावर अशी फांदी पडून कोणताही अघोरी प्रसंग ओढवू नये, यासाठी वनविभागाने तात्काळ संपूर्ण जावली तालुक्यातील शाळा परिसराची पाहणी करावी आणि तिथली धोकादायक झाडे हटवून विद्यार्थ्यांचा मार्ग सुरक्षित करावा.”
– वीरेंद्र शिंदे
(जिल्हा दिशा समिती सदस्य, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, कुडाळ)



