Home » पाटण » कोयनानगरमध्ये मानवी वस्तीत जखमी बिबट्या जेरबंद; प्रशासनाच्या संथ प्रतिसादाबद्दल नागरिकांमधून प्रश्नचिन्ह

कोयनानगरमध्ये मानवी वस्तीत जखमी बिबट्या जेरबंद; प्रशासनाच्या संथ प्रतिसादाबद्दल नागरिकांमधून प्रश्नचिन्ह

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाटण :  कोयनानगरमध्ये मानवी वस्तीत पुन्हा एकदा बिबट्या शिरल्याने येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोस्ट ऑफिसच्या मागे असलेल्या एका घराशेजारील ओढ्याजवळ दीड ते दोन वर्षे वयाचा एक जखमी बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, या बिबट्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याची माहिती समोर आल्याने परिस्थिती अधिकच संवेदनशील आणि धोकादायक बनली होती.

​घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने वन्यजीव विभागाला संपर्क साधला. मात्र, नागरिकांकडून दुपारी साडेबारा वाजता वर्दी दिल्यानंतरही वन्यजीव विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक तास उशिराने म्हणजेच दुपारी दीड वाजता पोहोचले. आपत्कालीन आणि संवेदनशील परिस्थितीत वन विभागाचा हा संथ प्रतिसाद पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मानवी वस्तीत वन्यप्राणी शिरल्यानंतर प्रशिक्षित पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून योग्य ती उपाययोजना करणे अपेक्षित असताना, कर्मचाऱ्यांच्या या विलंबाने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

​घटनास्थळी उशिराने दाखल झाल्यानंतर वन्यजीव विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या संयुक्त व अथक साहसामुळे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले. डोळ्याला गंभीर दुखापत झालेल्या या बिबट्याला तात्काळ पुढील उपचारांसाठी कराड येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असला, तरी या घटनेने अनेक गंभीर प्रश्न मागे सोडले आहेत.

​कोयनानगर परिसरात बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही निवासी भागात बिबट्याची तीन पिल्ले आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता नवीन मार्केटसारख्या गजबजलेल्या आणि वर्दळीच्या भागात जखमी बिबट्या आढळल्यामुळे कोयनानगर हे जणू बिबट्यांचा ‘हॉटस्पॉट’ बनत चालले आहे का, अशी भीती व्यक्त होत आहे. कोयना प्रकल्पाच्या जुन्या वसाहती, पडक्या इमारती आणि आजूबाजूला पसरलेली झाडीझुडपे यामुळे वन्यप्राण्यांना लपण्यासाठी अनुकूल जागा मिळत असून, त्यांचे मानवी वस्तीत येण्याचे मार्ग सुकर होत आहेत.​जखमी बिबट्याला पकडण्यात आणि उपचारासाठी पाठवण्यात यश आले असले, तरी आपत्कालीन स्थितीत प्रशासनाचा प्रतिसाद इतका संथ का होता, यावर वन्यजीव विभागाने आत्मपरीक्षण करून स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. भविष्यातील मोठा धोका टाळण्यासाठी केवळ घटना घडल्यानंतर यंत्रणा सक्रिय होण्याऐवजी, संवेदनशील भागांत नियमित गस्त, कॅमेरा ट्रॅपचा वापर आणि नागरिकांसाठी सतर्कतेची मोहीम राबवणे काळाची गरज बनले आहे. नागरिकांचे प्राण आणि वन्यजीवांचे संरक्षण या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असून, प्रशासनाने आता ठोस कृती आराखडा तयार करून तातडीने पावले उचलणे अपरिहार्य आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers