Home » कराड » ​’खाशाबा’ चित्रपटाचा टीझर वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयीन आयोगाच्या नियुक्तीवर शनिवारी सुनावणी

​’खाशाबा’ चित्रपटाचा टीझर वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयीन आयोगाच्या नियुक्तीवर शनिवारी सुनावणी

लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील दृश्ये वापरल्याचा दावा; पुणे दिवाणी न्यायालयात कायदेशीर लढाई तीव्र

​कराड (पांचगणी न्यूज नेटवर्क) : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘खाशाबा’ चित्रपटाचा टीझर ऑनलाइन प्रदर्शित होताच तो मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या टीझरमधील पाच प्रमुख दृश्ये लेखक संजय दुधाणे यांच्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या मूळ पुस्तकातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, चित्रपट प्रदर्शनापूर्वी न्यायालयीन आयोगाची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी दाखल केलेल्या अर्जावर येत्या शनिवारी (दि. ४ जुलै) पुणे दिवाणी न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

​या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, न्यायालयात कॉपीराइटचा दावा प्रलंबित असतानाही १ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये ‘खाशाबा’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर मूळ कथालेखक संजय दुधाणे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रॉडक्शन यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान, जुलै महिन्यापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही, अशी तोंडी ग्वाही नागराज मंजुळे यांचे वकील ॲड. रामकृष्ण कुलकर्णी यांनी न्यायालयाला दिली. यानंतर लेखक दुधाणे यांच्या वकिला ॲड. सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयात एक महत्त्वपूर्ण अर्ज दाखल केला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी न्यायालयीन आयोगाने स्वतः चित्रपट पाहावा आणि संजय दुधाणे यांच्या पुस्तकाचे वाचन करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. न्यायाधीश अग्रवाल यांनी हा अर्ज सुनावणीसाठी मंजूर केला असून, ४ जुलै रोजी यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

​’खाशाबा’ चित्रपट हा संजय दुधाणे यांच्याच पुस्तकावर आधारित आहे, हे सिद्ध करणारे तब्बल १९ भक्कम पुरावे ॲड. सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयासमोर सादर केले आहेत. यापैकी ५ पुरावे थेट चित्रपटाच्या टीझरवरून स्पष्ट होतात, तर ४ पुरावे नागराज मंजुळे यांनी स्वतः दाखल केलेल्या ५ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यातून समोर आले आहेत. उर्वरित ६ पुरावे रणजीत जाधव यांच्याशी झालेल्या कराराच्या संदर्भातील आहेत.

​विशेष म्हणजे, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लेखक दुधाणे यांच्यावर जो ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे, त्यातील शपथपत्रातच (Affidavit) चित्रपटाची कथा दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे पुरावे जोडले गेले आहेत. सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे आपण हा चित्रपट बनवत असल्याचे मंजुळे यांनी म्हटले असले, तरी या शपथपत्राच्या पान क्रमांक २१५ व २१६ वर संजय दुधाणे यांचा ‘कथालेखक’ म्हणून स्पष्ट उल्लेख आढळतो. याशिवाय मंजुळे यांनी दिलेले ४ संदर्भ दुधाणे यांच्या पुस्तकाशी तंतोतंत जुळणारे आहेत.

​टीझरवरून हा चित्रपट संजय दुधाणे यांच्या पुस्तकावरच निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून, हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही, असा ठाम दावा लेखक संजय दुधाणे आणि ‘खाशाबा जाधव प्रबोधिनी’चे समन्वयक सागर ठाणेकर यांनी केला आहे. आता शनिवारच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे क्रीडा आणि चित्रपट क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

​पुस्तकातील नाट्यमय प्रसंग टीझरमध्ये जशाच्या तसे!

​’खाशाबा’ चित्रपटाच्या टीझरमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, खाशाबांचे प्राचार्य, तत्कालीन इंग्रज अधिकारी, बडोद्याचे माणिकराव, पंजाबी मल्लांवर झालेला अन्याय, तसेच कुस्ती, मल्लखांब आणि खो-खो या खेळांमधील खाशाबांचे अष्टपैलू पैलू दाखवणारे सीन्स स्पष्टपणे दिसतात. हे सर्व प्रसंग संजय दुधाणे यांनी आपल्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या पुस्तकात अत्यंत नाट्यमय रित्या मांडले आहेत. टीझरमधील आणि विशेषतः पुस्तकातील पहिल्या प्रकरणाच्या पहिल्या पानावरील प्रसंग जशाच्या तसा चित्रपटात आल्याचे दिसून येत असल्याने कॉपीराइटचा हा वाद अधिक गडद झाला आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers