पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जावली तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांच्या कौशल्याने आता राज्याच्या सीमा ओलांडून देशात नवा नावलौकिक मिळवला आहे. काटवली येथील प्रसिद्ध ‘गजराज कला केंद्र’ निर्मित अत्यंत देखण्या, आकर्षक आणि सुबक गणेशमूर्तींना यंदा थेट मध्य प्रदेशातून मोठी मागणी आली असून उज्जैन, इंदूर तसेच महाकाल नगरीत या मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील कलेने थेट परराज्यात घेतलेली ही भरारी संपूर्ण जावली तालुक्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.
काटवली येथील ‘गजराज कला केंद्रा’ने नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक गणेशमूर्तींसाठी गणेशभक्तांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. केवळ मूर्तीकामच नव्हे, तर त्यासोबत केली जाणारी कलात्मक सजावट आणि मूर्तीतील भावमुद्रा हे या कला केंद्राचे मुख्य आकर्षण राहिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गजराज कला केंद्रात मूर्तिकारांची लगबग पाहायला मिळत होती.
महाराष्ट्रातील मुंबई, सांगोला, बीड अशा विविध भागांतून दरवर्षी या मूर्तींना मोठी मागणी असतेच; परंतु यंदा मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन आणि महाकाल नगरीतील भक्तांपर्यंत या मूर्ती सुखरूप पोहोचवण्यासाठी विशेष पार्सल व्यवस्थेचा वापर करण्यात आला. परराज्यात मूर्ती रवाना होताना कला केंद्राच्या सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि तृप्ती पाहायला मिळाली.
या यशाबद्दल बोलताना गजराज कला केंद्राचे संचालक प्रणय बेलोशे म्हणाले, “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काटवली आणि पांचगणी परिसरात सातत्याने हा व्यवसाय करत आहोत. गतवर्षी इंदूर येथील एका ग्राहकाने पांचगणी येथे येऊन आमच्याकडून गणेशमूर्ती खरेदी केली होती. आमच्या मूर्तीचे काम आणि सजावट आवडल्यामुळे त्यांनी यंदा तिथूनच आधीच बुकिंग करून मूर्ती मागवून घेतली. त्यांच्या माध्यमातून आता परराज्यातील अनेक नवीन ग्राहक आमच्याशी जोडले जात आहेत. पांचगणी आणि काटवलीसारख्या ग्रामीण भागातून तयार झालेल्या मूर्ती जेव्हा महाकाल नगरीत आणि परराज्यात जातात, तेव्हा मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. यामुळे आम्हाला आमच्या व्यवसायात आणखी नवनवीन प्रयोग आणि अधिक उत्कृष्ट काम करण्याची मोठी ऊर्जा मिळाली आहे.”
पाचगणी आणि जावली परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपत स्थानिक कलाकारांनी घडवलेल्या या मूर्ती आता परराज्यातही पूजल्या जाणार असल्याने स्थानिक नागरिकांमधूनही गजराज कला केंद्राचे आणि प्रणय बेलोशे यांचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील उद्योग-व्यवसाय योग्य कौशल्य आणि दर्जाच्या जोरावर देशपातळीवर कसा पोहोचू शकतो, याचे एक उत्तम उदाहरण काटवलीच्या गजराज कला केंद्राने घालून दिले आहे.



