पांचगणी न्यूज नेटवर्क
जावली : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जावली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल बामणोली (तर्फ कुडाळ) या विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन करत संपूर्ण तालुक्यात आपल्या शाळेचा आणि गाण्याचा गौरव वाढवला आहे.
शुक्रवार दि. 9 आणि शनिवार दि. 10 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या या जिगरबाज स्पर्धांमध्ये बामणोलीच्या खेळाडूंनी ट्रॅक आणि फिल्ड प्रकारांत वर्चस्व गाजवले. मामुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आणि सातारा येथील श्री छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी अपार मेहनत आणि जिद्दीचे प्रदर्शन घडवले.
स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंमध्ये 14 वर्षे वयोगट मुलींच्या 600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कु. तपस्वी संतोष तरडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 17 वर्षे वयोगट मुलांच्या 1500 मीटर धावण्यात समर्थ सुयोग खटावकर आणि 3000 मीटर धावण्यात सोहम कृष्णा तरडे यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. याचप्रमाणे 17 वर्षे वयोगट मुलींच्या 800 मीटर धावण्याच्या अतिशय अटीतटीच्या स्पर्धेत कु. वैष्णवी अनिल गुरव हिने प्रथम क्रमांक मिळवत मैदान मारले.
रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट करत बामणोलीच्या इतर खेळाडूंनीही आपले कौशल्य सिद्ध केले. 14 वर्षे वयोगट मुले 100 मीटर धावणे आणि लांब उडीमध्ये अर्णव दिगंबर शिर्के याने द्वितीय क्रमांक मिळवला. 17 वर्षे वयोगट मुलींच्या 3000 मीटर धावण्यात आराध्या मच्छिंद्र जाधव आणि 1500 मीटर धावण्यात कु. जान्हवी पांडुरंग शिर्के यांनी द्वितीय स्थान पटकावले.
याशिवाय कु. वृंदा समीर महामुलकर (गोळाफेक), अथर्व दिगंबर शिर्के (थाळीफेक), कु. प्रगती मिथुन तरडे (लांब उडी), देव विजय शिंदे (200 मीटर धावणे), सार्थक शंकर महामुलकर (800 मीटर धावणे), कु. अंजना श्रीकृष्ण पवार (400 मीटर धावणे), कु. नेत्रा नामदेव शिर्के (300 मीटर चालणे), कु. स्वराली दीपक शिर्के (लांब उडी) तसेच 17 वर्षे मुले 4 गुणिले 100 मीटर रिले संघाने (देव विजय शिंदे, सोहम कृष्णा तरडे, समर्थ सुयोग खटावकर, सार्थक शंकर महामुलकर) उत्कृष्ट खेळ करत तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल यशस्वी खेळाडूंचे, मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच क्रीडा क्षेत्रातील या भरघोस कामगिरीबद्दल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत धनवडे सर, उपाध्यक्ष मा. श्री. शिवाजी दादा तरडे, सचिव मा. श्री. विक्रमसिंह धनवडे, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. संजय धुमाळ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. चंद्रकांत कर्णे साहेब, केंद्रप्रमुख मा. श्री. शशिकांत शेलार साहेब, मुख्याध्यापक मा. श्री. शशिकांत शिर्के सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. निलेश ज्ञानेश्वर तरडे, बामणोली ग्रामपंचायतीच्या सरपंच मा. सौ. रेखाताई तरडे, उपसरपंच मा. श्री. पवन धर्म तरडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध सोसायटींचे पदाधिकारी, शालेय समित्यांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून खेळाडूंना पुढील राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.



