*पांचगणी न्यूज नेटवर्क
मेढा :- रसायनी येथील गुलमोहर सोसायटीमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात श्री. सर्जेराव धनावडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा मांडणारी एकांकिका प्रभावीपणे सादर केली. त्यांच्या संवाद शैली, अभिनयाला आणि वास्तवदर्शी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्यांना एकांकिकेत प्रथम क्रमांक मिळाला.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मामुर्डी गावचे सुपुत्र सर्जेराव श्रीपती धनावडे ( आबा ) यांनी यापूर्वी धमाल बाबल्या गणप्याची, जिवा सखा अशा डझनभर चित्रपटात यांचे सोबत कामे केली आहेत तसेच विविध नाटकंमध्ये सुद्धा कामे केली आहेत
शेतकऱ्याला दुष्काळ, पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान, वाढता उत्पादनखर्च, कर्जाचा ताण आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता असा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे, याची तीव्र वेदना त्यांच्या भूमिकेतून प्रभावीपणे मांडली. त्यांच्या अभिनयामुळे सोसायटीतील अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. उपस्थितांनी “शेतकरी वाचला पाहिजे”, “त्यांच्या कष्टाची दखल घ्या” असे उद्गार काढले.
कार्यक्रमानंतर सोसायटीचे अध्यक्ष श्री. प्रवीण पवार यांच्या हस्ते श्री. सर्जेराव धनावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीतील सदस्य, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक मंडळ, गुलमोहर सोसायटी, रसायनी यांनी सांगितले की, “सर्जेराव धनावडे यांचे सादरीकरण हे केबळ एकांकिका नव्हते, तर आजच्या शेतकऱ्यांच्या वास्तवाचे जिवंत चित्रण होते. त्यांच्या या उत्कृष्ट भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकेडे सर्वाचे लक्ष वेधले गेले.”
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



